बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेला रुग्ण पळवणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:03 AM2020-01-08T11:03:55+5:302020-01-08T11:09:44+5:30
डॉक्टरांनी स्वतःच्या खाजगी रुग्णालयात नेले उपचारासाठी
बीड : चार दिवसांपूर्वी एका अपघातातील रुग्णाला शासकीय रुग्णालयातून आपल्या खाजगी रुग्णालयात नेत उपचार केल्याचा प्रकार घडला होता. याची तक्रारही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे करण्यात आली होती. चौकशी करून एका डॉक्टरची जिल्हा रुग्णालयातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. कंत्राटी पद्धतीवर हा डॉक्टर कार्यरत होता. या प्रकरणाला शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनीही दुजोरा दिला आहे.
जिल्हा रुग्णालयात सामान्य, गरीब रुग्ण येतात. आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्याने शासकीय रुग्णालय त्यांच्यासाठी एक आधार असते. मात्र, याच रुग्णालयात कार्यरत असतानाही अनेकांची खाजगी रुग्णालये आहेत. हे डॉक्टर सरकारी रुग्णालयात तात्काळ सेवा देण्या ऐवजी आपल्या खाजगी रुग्णालयात रुग्णांची पळवापळवी करताना दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वीही एका रुग्णालयाला कंत्राटी पद्धतीवर असलेल्या एका डॉक्टरने आपल्या खाजगी रुग्णालयात नेले. हा प्रकार लक्षात येताच एकाने याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे केली. यावर तात्काळ चौकशी समिती नियूक्त केली. समितीच्या अहवालावरून संबंधित डॉक्टरवर जिल्हा रुग्णालयातून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजताच ही कारवाई झाल्याचे समजते. या कारवाईला डॉ.थोरात यांच्याकडून दुजोरा मिळाला आहे. डॉक्टरचे नाव मात्र, अद्यापही समोर आलेले नाही.
(सविस्तर वृत्त लवकरच)