कामचुकारांना दणका; दोन तंत्रज्ञांची आरोग्य विभागातून हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 05:25 PM2021-08-18T17:25:43+5:302021-08-18T17:26:55+5:30
रूग्णांच्या तक्रारीवरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी बुधवारी दुपारी तडकाफडकी ही कारवाई केली आहे.
बीड : जिल्हा रूग्णालयात कोरोना चाचणीसाठी असलेल्या पोर्टेबल केबीनमधील दोन तंत्रज्ञ गैरहजर राहिल्याने त्यांना आरोग्य विभागातून कार्यमुक्त करत हकालपट्टी करण्यात आली आहे. रूग्णांच्या तक्रारीवरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी बुधवारी दुपारी तडकाफडकी ही कारवाई केली आहे. चाचणीसाठी संशयितांच्या रांगा असतानाही गैरहजर राहणे या तंत्रज्ञांना चांगलेच अंगलट आले. या कारवाईने कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत.
सोनल चव्हाण व रविकिरण गिरी अशी कार्यमुक्त झालेल्या तंत्रज्ञांची नावे आहेत. गिरी यांची सकाळी तर चव्हाण यांची दुपारी ड्यूटी होती. हे दोघेही वेळेवर आले नाहीत. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी पोर्टेबल केबीनबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात वृद्धांचाही समावेश होता. यामुळे संतापलेल्या काही लोकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांना फोनवरून तक्रारी केल्या. डॉ.साबळे यांनी तात्काळ धाव घेत खात्री केली. यात त्यांना दोघेही दोषी आढळले. यावर दोघांना स्वत:च्या स्वाक्षरीने कार्यमुक्त करून दुसऱ्याला त्या ठिकाणी ड्यूटीवर पाठविले. या तडकाफडकी कारवाईमुळे कामचुकारपणा व मनमानी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
दोघेही दोषी आढळले
पोर्टेबल केबीनबाहेर कोरोना चाचणीसाठी रांगा लागल्या होत्या. चाचणी करण्यासाठी तंत्रज्ञ हजर नाहीत, अशा तक्रारी होत्या. खात्री केल्यावर दोघेही दोषी आढळले. यावर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. हलगर्जीपणा करणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही.
- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड