नदीपात्रातून वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:22 AM2021-06-29T04:22:56+5:302021-06-29T04:22:56+5:30
‘रोहयो’चे काम देण्याची मागणी बीड : तालुक्यात मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करून ...
‘रोहयो’चे काम देण्याची मागणी
बीड : तालुक्यात मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. कोरोनाचे संकट उद्भवल्याने शहरी भागातील कामेही बंद झाली आहेत. कामच नसल्यामुळे अनेक कुटुंबांचे रोजगाराअभावी हाल सुरू आहेत. यासाठी शासनाने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी मजुरांमधून केली जात आहे.
कागदी ग्लास वापरण्याकडे दुर्लक्ष
बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाळगण्यासाठी टपरीचालकांनी ग्राहकांना कागदी ग्लासात चहा देण्याची गरज आहे. मात्र, अनेक विक्रेते काचेच्या ग्लासात चहा देऊ लागले आहेत. त्यामुळे संसर्ग उद्भवू शकतो. यासाठी कागदी ग्लासचा वापर प्राधान्याने करावा, अशी मागणी चहाप्रेमींमधून आहे.
विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत
पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्राचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षण कठडयांचा अभाव असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होतो. उघडे फ्यूज, तार व हे बॉक्स उघडेच असतात. या प्रकाराकडे ‘महावितरण’चे मोठे दुर्लक्ष होत आहे.
पाणंद रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास
बीड : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या पाणंद रस्त्याची दुरावस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील रस्त्याची दुरूस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात येताना जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो तसेच शेतीमाल नेतानादेखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्ता दुरूस्तीची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.
शेतमजुरांना विमा कवचाची प्रतीक्षा
अंबाजोगाई : कोरोनाच्या काळात शेतमजुरांना रोजगारासाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिथे काम मिळेल. तिथे रोजगारासाठी जावे लागते. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग, अपघाती प्रसंग ओढावल्यास शेतमजुरांना विमा कवच असले पाहिजे.