सोनोग्राफी मशीन सुरू झाल्याने रुग्णांची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:32 AM2021-04-21T04:32:53+5:302021-04-21T04:32:53+5:30
केज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर महिलांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पुढील उपचाराच्या निदानासाठी सोनोग्राफीचा सल्ला दिला ...
केज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर महिलांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पुढील उपचाराच्या निदानासाठी सोनोग्राफीचा सल्ला दिला जातो. परंतु येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफीची मशीन बंद असल्याने रुग्णांना बाहेरून सोनोग्राफी करावी लागत होती. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत काही तपासण्या होत नसल्याने त्या तपासण्याही रुग्णांना बाहेरच्या खासगी प्रयोगशाळेतून कराव्या लागत होत्या.
त्यामुळे केज उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन चालू करण्याची मागणी होत होती. या मागणीची दखल वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी घेत उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन चालू केली. त्यानंतर आतापर्यंत १८० गरोदर मातांची तपासणी करण्यात आली, तर ८५ साधारण महिलांची तपासणी करण्यात आली. तसेच प्रयोगशाळेत ३२ लाख रुपयांची मशीन कार्यन्वित केल्याने उपजिल्हा रुग्णालयात आता २४ तास सर्व तपासण्या होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन व प्रयोगशाळा चालू करण्यात आल्याने रुग्णांना याचा फायदा होणार आहे.