'भाजीपाला विक्रीची सोय करा'; किसानसभेने केले भाजीपाल्याचे मोफत वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:06 PM2021-03-10T13:06:27+5:302021-03-10T13:07:05+5:30
corona virus कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.
धारूर : बीड जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे आठवडी बाजार बंद केल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीची सोय करण्याची मागणी करत किसानसभेच्यावतीने बसस्थानक परिसरात मोफत भाजीपाला वाटप करण्यात आले.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. या आदेशामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. मेहनत करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावात विकावा लागत आहे. यामुळे शेतकरी गतवर्षी प्रमाणेच पुन्हा अडचणीत आला आहे. यामुळे शेतकऱ्याची होणारी लुट व नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीसाठी सुविधा निर्माण करावी अशी मागणी तहसीलदारांना निवेदन देऊन किसानसभेच्यावतीने करण्यात आली. तसेच बसस्थानक परिसरात नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी किसानसभेचे मोहन लांब, काशीराम सिरसट, संजय चोले, डॉ. अशोक थोरात यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.