'एमडी' परीक्षेत अपयश, मनोरुग्ण डॉक्टर मुलाने बापाच्या डोक्यात घातला खलबत्ता
By सोमनाथ खताळ | Published: July 19, 2023 05:53 PM2023-07-19T17:53:52+5:302023-07-19T17:55:14+5:30
देवाची आरती का देतो, असे म्हणत केली मारहाण; गंभीर जखमी बापाचा उपचारादरम्यान मृत्यू
बीड : बीएएमए नंतरची एमडी पदवी घेण्यात अपयशी ठरलेल्या मुलाने स्वता:च्या बापाच्या डोक्यातच खलबत्ता व लोखंडी बतई मारून काटा काढला. ही घटना बीड शहरातील अंकुशनगर भागात मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलाविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश कुलकर्णी (वय ७०) असे मयताचे नाव असून सुधील कुलकर्णी (वय ३८) असे खुन करणाऱ्या मुलाचे नाव आहे. सुधील हा एकुलता एक मुलगा आहे. २०१० साली त्याने बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने एमडीची तीन वर्षे तयारी केली. परंतू त्यात त्याला अपयश आले. तेव्हापासून त्याच्या मनावर परिणाम झाल्याने तो वेड्यासारखा वागत होता. आई-वडिलांनी त्याला एका खासगी दवाखान्यातही नोकरीस लावले, परंतू त्याने तेथेही काम केले नाही. त्याच्या वागण्यात सुधारणा होत नसल्याने त्याला बीडसह लातूर, सोलापूर येथील रूग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. तीन वर्षापूर्वी जिल्हा रूग्णालयातही उपचार करण्यात आले. परंतू त्याने औषधी घेतली नाही. त्यामुळे तो जास्तच वेडसर झाला होता. गल्लीतही उघडा, नग्न अवस्थेत फिरत असे. त्यामुळे परिसरातील लोकही त्याला वैतागले होते. तसेच तो आई-वडिलांनाही नेहमीच मारहाण करत असेल.
मंगळवारी रात्रीही सुरेखा व सुरेश कुलकर्णी यांनी देवाची पुजा केली. त्यानंतर आरती देण्यासाठी सुरेश हे सुधीरकडे गेले. परंतू तु मला कशाची आरती देताे, कापुर उदबत्ती लावतो, असे म्हणत त्याने मारहण केली. त्यानंतर बाजुलाच पडलेला खलबत्ता डोक्यात मारला. तसेच लोखंडी बतईनेही मारहाण केली. आई सोडविण्यासाठी धावली असता त्यांनाही मारहाण केली. या मारहाणीत सुरेश कुलकर्णीही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरेखा कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून मुलगा सुधीर याच्याविरोधात शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे करत आहेत.