१० डॉक्टरांचा कर्तव्यात कसूर; रुग्णांना सोडले वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:13+5:302021-07-29T04:33:13+5:30
थेट कोरोना वॉर्डातून बीड : कोरोनासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांना वाऱ्यावर सोडत डॉक्टर गायब राहिल्याची धक्कादायक बाब बुधवारी दुपारी समोर ...
थेट कोरोना वॉर्डातून
बीड : कोरोनासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांना वाऱ्यावर सोडत डॉक्टर गायब राहिल्याची धक्कादायक बाब बुधवारी दुपारी समोर आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी अचानक राऊंड घेऊन केलेल्या तपासणीत तब्बल १० डॉक्टर आणि ३ नर्सेस वॉर्डात गैरहजर आढळल्या. यावरून कोरोनात डॉक्टर, नर्सचा मनमानी कारभार चालत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. तशाच उपचाराबद्दल रोज तक्रारी वाढतच आहेत. औषधी बाहेरून आणायला लावणे, डॉक्टर व नर्सेसकडून दुर्लक्ष होणे यांचा यात समावेश आहे. तसेच साहित्य व यंत्रसामग्रीचीही मागणी येत होती. या सर्व तक्रारी पाहता बुधवारी दुपारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे हे स्वत: कोरोना वॉर्डमध्ये राऊंडला गेले. त्यांनी तपासणी केली असता तब्बल सहा डॉक्टर हे पुढच्या डॉक्टरला कल्पना न देताच निघून गेले होते, तर चार डॉक्टर हे वेळ होऊनही वॉर्डात आलेलेच नव्हते. तसेच ३ नर्सेसही गायब होत्या. हा सर्व प्रकार पाहून डॉ. साबळे चांगलेच संतापले. त्यांनी प्रमुखांना चांगलेच झापले. या सर्वांना तत्काळ नोटीस काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या, तसेच दुसरे डॉक्टर, नर्स उपलब्ध करून देण्यासह सांगितले. यावेळी डॉ. महेश माने, डॉ. सचिन आंधळकर आदींची उपस्थिती होती.
या डॉक्टरांचा समावेश
सकाळी ८ ते २ या वेळेत दुसरा डॉक्टर येण्यापूर्वीच डॉ. ज्योती काकडे, डॉ. शीतल सोनवणे, डॉ. शीतल चिंचखेडे, डाॅ. प्रियंका मस्तूद, डॉ. श्रुतिका तांबे, डॉ. किरण शिंदे हे निघून गेले होते, तर दुपारी २ नंतर डॉ. प्रियंका तांदळे, डॉ. सायमा नाझ, डॉ. नम्रता कदम, डॉ. चंद्रकांत वाघ या चौघांनी वॉर्डात हजेरी लावलेली नव्हती. या सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत.
‘त्या’ महिला डॉक्टरवर होणार कारवाई
आयसीयू १ मध्ये डॉ. निकिता दराडे या महिला डॉक्टरने रुग्णाला बाहेरून औषधी आणण्यास सांगितले. ही बाब निदर्शनास येताच डॉ. साबळे यांनी संबंधित महिला डॉक्टरला तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. मात्र रात्री उशिरापर्यंत कारवाई झालेली नव्हती.
बायपॅप अन् मॉनिटरची मागणी
प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन उपलब्ध यंत्रसामग्री व मागणी याचा आढावा घेण्यात आला. यावेळी बायपॅप मशीन व मॉनिटरची मागणी सर्वाधिक करण्यात आली. काही ठिकाणी औषधी व इतर साहित्य मागविण्यात आले.
---
कोरोना वॉर्डचा राऊंड घेतला. उपलब्ध यंत्र, साहित्यासह मागणीचा आढावा घेतला. तसेच गैरहजर डॉक्टर, कर्मचाऱ्यांचीही हजेरी घेतली. सर्वांना नोटीस काढण्यात आली आहे. तसेच बाहेरून औषधी आणायला लावणाऱ्या डॉ. निकिता दराडे यांना कार्यमुक्त करण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
डाॅ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
280721\28_2_bed_8_28072021_14.jpeg
कोरोना वॉर्डातील साहित्य व गैरहजर डॉक्टरांची माहिती घेताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे. सोबत डॉ.महेश माने, डॉ.सचिन आंधळकर, गणेश पवार आदी.