मालजगावात चारी नादुरुस्त; पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:25 PM2017-12-04T23:25:40+5:302017-12-04T23:38:06+5:30
माजलगाव धरणातून शेतीच्या सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : माजलगाव धरणातून शेतीच्या सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत असताना संंबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांतून संताप व्यक्त होत आहे.
माजलगाव धरण क्षेत्रामधील वितरीका क्रमांक १ मधील मायनर ५ मधील चारी नादुरुस्त आहे. परिसरातील शेतकºयांनी अनेक वेळा चारी नादुरुस्त असल्याबाबत कॅनल निरीक्षकाला सांगण्यात आले. याउपरही दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे दुसºया पाणी पाळीचे लाखो लिटर पाणी वाहून जाऊन अनेकांच्या कापसाचे नुकसान झाले, तर अनेकांच्या शेतात तळे साचले होते.
पाटबंधारे विभागाने या परिसरात पोकलेन पाठवले होते; मात्र संंबंधित अधिका-यांनी मर्जीतीलच लोकांच्या शेतातील चारी दुरुस्तीचे काम केले. बाकी काम अर्धवट सोडून पोकलेन वापस घेऊन गेले. त्यामुळे पाणी पाळीने अनेक शेतक-यांच्या शेतात तळे साचून कापूस, ज्वारीचे नुकसान झाले. पाटबंधारे विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पाणी असूनही शेतक-यांना त्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली असून, लाखो लिटर पाणी डोळ्यादेखत वाहून जात आहे. चारी दुरूस्त करावी, अशी मागणी जोतीराम पठाडे, सूर्यकांत होके, विश्वनाथ शेटे, श्रीराम राठोड, राजेश कुलथे, विठ्ठल नरसाळे आदींनी केली आहे.
या चा-यांचा सर्व्हे करून तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल, असे माजलगाव पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी बी. आर. शेख यांनी सांगितले.
नियोजन, तरीही नासाडी
माजलगाव धरण शंभर टक्के भरल्याने सिंचन विभागाकडून पाणी पाळीचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने ठिकठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे चित्र आहे.