आरोग्य विभागाचे अपयश ; मृत्यूदर होईना कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:34 AM2021-02-16T04:34:36+5:302021-02-16T04:34:36+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण कमी होत असले तरी मृत्यूदर वाढतच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाेर्टलवर ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण कमी होत असले तरी मृत्यूदर वाढतच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाेर्टलवर ५६९ तर ऑफलाईन तब्बल ५९४ मृत्यूची नोंद आहे. यात बीड व अंबाजोगाई तालुक्यात तर मृत्यूने शतक ओलांडले आहे. जिल्ह्यात सध्या मृत्यूदराचा टक्का ३.२६ एवढा असून तो कमी करण्यात आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरत आहे. ही परिस्थिती बीडकरांसाठी चिंताजनक आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार १९१ कोरोनाबाधि रुग्ण आढळले आहेत. पैकी १७ हजार ४२२ कोरोनामुक्त झाले आहेत. पोर्टलवर ५६९ मृत्यूची नोंद असून ऑफलाईन ६९४ आहेत. मागील काही महिन्यांपासून राज्यातील मृत्यूदर कमी होत आहे. परंतु बीडमधील मृत्यूदर कमी होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. उपचारातील हलगर्जी, वेळेवर आणि पुरेशा सुविधा न मिळणे, वरिष्ठांचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील मृत्यूदर आटोक्यात येत नाहीत. जिल्ह्यात एवढी गंभीर परिस्थिती असतानाही आरोग्य विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. झालेल्या मृत्यूचे ऑडिट करण्यातच अधिकारी व्यस्त आहेत. परंतु, मृत्यूदर कमी करण्यात उपाययोजना करीत नसल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनाकाळात सहानुभूती मिळविणाऱ्या आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नियोजनशून्य उपाययोजना
जिल्हा रुग्णालयासह अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात कोरोनामुळे होणारे मृत्यू सर्वाधिक आहेत. असे असतानाही येथे कसल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या ढिसाळ नियोजनामुळे रुग्णांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. दर्जेदार उपचाराबद्दलही तक्रारी आहेत. असे असतानाही आरोग्य विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
कोट
जिल्हा रुग्णालयात कमी मृत्यू आहेत. तर अंबाजोगाईत जास्त आहेत. याबाबत अधिष्ठातांना विचारावे लागेल. मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्या वाढायला पाहिजेत. कारणमीमांसा सांगणे आता अवघड आहे.
डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
---
तालुकानिहाय मृत्यू
बीड१४२
आष्टी ४९
पाटोदा २५
शिरूर १४
गेवराई ४०
माजलगाव ४४
वडवणी ११
धारूर ३४
केज ५५
अंबाजोगाई १०७
परळी ६८
इतर ५