मातीशी इमान ! IAS किरण गीतेंनी गावी येताच औत धरून केली शेतीची मशागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 05:07 PM2021-11-04T17:07:24+5:302021-11-04T17:08:57+5:30
परळी तालुक्यातील बेलंबा येथे त्रिपुराचे पर्यटन सचिव आयएएस अधिकारी किरणकुमार गीते दिवाळीच्या सुट्यानिमित्त आले आहेत.
परळी (बीड ) : ग्रामीण भागातील व्यक्ती उच्च प्रशासकीय पदावर गेल्यानंतर त्याचे आपल्या भागाशी नाळ तुटते या सार्वत्रिक समजाला खोटे ठरवत परळी तालुक्यातील बेलंबा गावचे भूमिपुत्र IAS किरण कुमार गित्ते यंदा दिवाळीत गावी आल्यानंतर शेतकऱ्याच्या भूमिकेत येत चक्क औत हाकून शेतीत घाम गाळला. त्यांच्या या कृत्याने मोठ्या साहेबांचा अजूनही काळ्या मातीशी इमान असल्याचे कौतुक ग्रामस्थांमध्ये होत आहे.
किरण कुमार गित्ते सध्या त्रिपुरा राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, पर्यटन विभागाचे सचिव या प्रशासनातील उच्च पदावर कार्यरत आहेत. किरण कुमार गित्ते यांचे प्राथमिक शिक्षण श्री संत गुरुलिंग स्वामी बेलवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे झालेले आहे. पुढे माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी पुणे येथे इंजिनीरिंग पूर्ण केले. व टाटा कंपनीत जॉब केला. परंतु खाजगी नौकरित मन न रमल्यामुळे व आपल्या शिक्षणाचा आपल्या जन्मभूमीसाठी उपयोग व्हावा या देशसेवेच्या हेतूने त्यांनी युपीएससी परीक्षा दिली. ही परीक्षा उत्तीर्ण झाले. IAS झाल्यानंतर अमरावती येथे जिल्हाधिकारी पद भूषविले त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे आयुक्त म्हणून काम केले .सध्या ते त्रिपुरा येथे सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, पर्यटन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. परंतु आपल्या मातीशी घट्ट नाळ तुटू न देता या मातीतल्या लोकांच्या उत्थानासाठी सतत काहीतरी करत राहणे व शिक्षणाचे महत्व ओळखून दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने त्यांनी जागतिक दर्जाचे दिल्ली पब्लिक स्कुल व किरण गित्ते अकॅडमी परळी तालुक्यात सुरु केली आहे.
दिवाळीत गावी आल्यानंतरही प्रत्येकाशी कुठलाही बडेजाव न ठेवता आत्मीयतेने बोलत असतात. दिवाळीच्या सुट्टीत ते नुकतेच परळी तालुक्यातील बेलंबा या आपल्या गावी आले. येथे शेतात गेल्यानंतर औत पाहताच स्वतः त्यांनी शेतीची मशागत केली. 'गावाचा पोरगा साहेब झाला पण मातीशी इमान हाय' याची चर्चा पूर्ण तालुक्यात चालू आहे.