वर्गमैत्रिणीच्या नावे इन्स्टावर बनावट अकाउंट; डॉक्टर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 06:39 PM2022-01-08T18:39:43+5:302022-01-08T18:40:10+5:30
वर्गमैत्रिणीच्या नावे त्याने बनावट अकाउंट तयार केल्याचे पत्नीने पाहिले व त्यास जाब विचारला होता
बीड: एकतर्फी प्रेमातून वर्गमैत्रिणीच्या नावे इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले. त्याआधारे तिच्या मैत्रिणींशी चॅटिंग केली. गुन्हा नोंद झाल्यानंतर सायबर पोलिसांनी ७ जानेवारी रोजी डॉक्टरचा छडा लावला. त्याचा मोबाइल जप्त केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीतील एका डॉक्टर तरुणीने दीड महिन्यापूर्वी तिच्या नावे इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केल्याच्या फिर्यादीवरून माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद केला होता. हे प्रकरण तपासासाठी सायबर पोलिसांकडे आले. पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी इन्स्टाग्रामशी संपर्क करून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता डॉ. गोपाळ दहिवाळ (रा. पुणे) याने तरुणीचा फोटो वापरून तिच्या नावे बनावट अकाउंट तयार केल्याचे समोर आले. त्यानंतर ७ रोजी तो सायबर सेलमध्ये हजर झाला. यावेळी त्याची कसून चौकशी केली. त्याचा मोबाइल जप्त केला असून, त्यास नोटीस देऊन सोडले आहे. डॉ. गोपाळ दहिवाळ व तक्रार करणारी डॉक्टर तरुणी हे दोघे बीएचएमएसच्या प्रथम वर्षात एका वर्गात होते. त्या ओळखीतून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पत्नीने पाहिले अन्...
डॉ. गोपाळ दहिवाळ विवाहित आहे. वर्गमैत्रिणीच्या नावे त्याने बनावट अकाउंट तयार केल्याचे पत्नीने पाहिले व त्यास जाब विचारला. त्यानंरत ते अकाउंट डिलीट केले. मात्र, डॉक्टर तरुणीला तिच्या मैत्रिणींनी विचारले तेव्हा आपल्या नावे बनावट अकाउंट तयार करून कोणीतरी तोतयागिरी करत असल्याचे कळाले. त्यानंतर तीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.