बनसारोळ्यात बनावट देशी दारू पकडली; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By अनिल भंडारी | Published: July 10, 2023 06:59 PM2023-07-10T18:59:09+5:302023-07-10T19:00:35+5:30
पथकाने १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त
बीड : बनावट देशी दारू विक्री करणाऱ्या आरोपीला उत्पादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई येथील निरीक्षकांच्या पथकाने जेरबंद करत बनावट देशी मद्य व दुचाकीसह १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. केज तालुक्यातील बनसारोळा येथे ९ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली.
गुप्त बातमीनुसार सुनील छबू गायकवाड हा अवैध बनावट देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळताच बनसारोळा परिसरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून बनावट देशी दारूचे २२ बॉक्स, एक दुचाकी असा एकूण १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथील अधीक्षक विश्वजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक जी. एन. गुरव, अंबाजोगाईचे दुय्यम निरीक्षक रशिद बागवान व सहायक दुय्यम निरीक्षक एस. के. सय्यद, जवान आर. ए. जारवाल, के. एस. जारवाल, एस. व्ही. लोमटे यांनी ही कारवाई केली. तपास निरीक्षक जी. एन. गुरव हे करीत आहेत.