'बनावट लग्नाची वरात, पोलिसांच्या दारात'; नवरी निघाली अल्पवयीन...आई, भाऊही बनावट !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:30 PM2022-12-15T12:30:40+5:302022-12-15T12:31:12+5:30
यातील नवरी अल्पवयीन निघाली असून, तिचे नावही बनावट सांगितल्याचे उघडकीस आले.
बीड : अडीच लाख रुपये देऊन वसमत (जि. परभणी) येथे मुद्रांकावर लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात नवरदेवाने पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणात शहर ठाण्याच्या पोलिसांनी १२ डिसेंबरला आणखी पाच जणांना अटक केली. नवरी अल्पवयीन निघाली असून, लग्नातील आई, भाऊ बनावट असल्याची माहिती उजेडात आली आहे.
शहरातील एका ३२ वर्षीय तरुणाचा विवाह मध्यस्थामार्फत औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथील तरुणीशी जुळवला होता. ३ डिसेंबरला वसमत (जि. परभणी) येथे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर लग्न उरकले. त्यासाठी मध्यस्थाने अडीच लाख रुपये घेतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरीने करवली म्हणून आलेल्या मीना बळीराम बागल (२७, रा. छोटेवाडी, ता. माजलगाव) हिच्यासोबत पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, नवरदेवाने त्यांना पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. अधिक चौकशीत बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा हा कारनामा असल्याचे स्पष्ट झाले.
यातील नवरी अल्पवयीन निघाली असून, तिचे नावही बनावट सांगितल्याचे उघडकीस आले. तिला अंबाजोगाई येथील महिला सुधारगृहात पाठवले आहे. मीना बागल हिची वाढीव कोठडीनंतर १४ डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पोलिसांनी आणखी पाच जणांना १२ डिसेंबरला अटक केली. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
नावे सांगितली खोटी, नातेही बनावट
मुक्तीराम गोपीनाथ भालेराव (३१, रा. रिधोरा, जि. परभणी), प्रभाकर शिवाजी दशरथे ऊर्फ आकाश बालाजी माने (३५, रा. जोड परळी, जि. परभणी), विनोद किसन खिलारे (४४, रा. शिवणी बु., जि. हिंगोली), जयशीला प्रभाकर कीर्तने (३५, रा. अस्वला, जि. हिंगोली), पूजा कचरू निलपत्रेवार (२७, रा. तालाकट्टा, जि. परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. लग्नात त्यातील जयशीला कीर्तनेने नवरी मुलीची आई, तर प्रभाकर दशरथे याने भावाची भूमिका केली होती. त्या दोघांनी नावेदेखील खोटी सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे.