ऑनलाईन ऑर्डरमधून आला बनावट मोबाइल; सायबर पोलिसांमुळे पैसे परत
By सोमनाथ खताळ | Published: April 3, 2023 06:24 PM2023-04-03T18:24:15+5:302023-04-03T18:24:25+5:30
पोलिसांनी लगेच बँक, पार्सल देणारी यंत्रणा व इतर कार्यालयांना पत्र पाठवून हे पैसे थांबविण्यास सांगितले.
बीड : पार्सलद्वारे बनावट मोबाइल पाठवून माजलगावमधील एका व्यक्तीचे १६ हजार ५०० रुपये सायबर भामट्यांनी ऑनलाइन लुटले होते. सायबर पोलिसांकडे अर्ज येताच त्यांनी बँकेला पत्रव्यवहार करण्यासह इतर तपास केला. यात संबंधित व्यक्तीला सर्व रक्कम परत मिळाली असून, त्यांनी सायबर पोलिसांचा ठाण्यात येऊन सत्कार केला.
आकाश साळवे (रा. केसापुरी कॅम्प, माजलगाव) यांनी ऑनलाइन माेबाइल मागविला होता. त्यांना मोबाइलचे पार्सलही मिळाले. त्यासाठी १६ हजार ५०० रुपये पैसेही ऑनलाइन दिले. परंतु, त्यांना बनावट मोबाइल मिळाला. त्यांनी २ फेब्रुवारी रोजी याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी लगेच बँक, पार्सल देणारी यंत्रणा व इतर कार्यालयांना पत्र पाठवून हे पैसे थांबविण्यास सांगितले. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर साळवे यांच्या खात्यावर पैसे जमा झाले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवी सानप, सहायक पोलिस निरीक्षक भारत काळे, पोलिस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, निशिगंधा खुळे, पोलिस हवालदार भारत जायभाये, आशिष वडमारे, अनिल डोंगरे, विजयकुमार घोडके, अन्वर शेख, बप्पासाहेब दराडे, प्रदीप वायभट, पंचम वडमारे, सुनीता शिंदे, शुभांगी खरात आदींनी केली.