बीडमध्ये पकडला तोतया आरटीओ इन्स्पेक्टर, पोलिसांनाच म्हणाला, तुमच्या वाहनाचे काम करून देतो...
By सोमनाथ खताळ | Published: March 4, 2024 04:51 PM2024-03-04T16:51:04+5:302024-03-04T16:51:43+5:30
आपण अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगत करत असे वावर
बीड : अंगावर खाकी घालून आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून फिरणाऱ्या बोगस अधिकाऱ्याला बीडच्या एआरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राहुल नाईकवाडे (रा.बीड) असे पकडलेल्या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. नाईकवाडे याने आपण अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगितले आहे. सोमवारी तो एका पोलिस कर्मचाऱ्याचे काम करून देण्यासाठी बीडच्या कार्यालयात आला होता. अर्धा ते एक तास तो या कार्यालयाच्या आवारात फिरला. काही ओरीजनल अधिकाऱ्यांनाही तो सुरूवातीच्या काळात ओळखायला आला नाही. परंतू नंतर त्याच्या हावभाव लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर तो तोतया असल्याचे समजले. त्याला पकडून बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नेले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकाराने मात्र, खळबळ उडाली आहे.