सोयाबीनच्या दरात घसरण; शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:19+5:302021-09-25T04:36:19+5:30
पाच दिवसांत तीन हजारांची घसरण : सोयाबीन काढणीला झाली सुरुवात बीड : सोयाबीन हे चांगला भाव मिळणारे पीक असल्याने ...
पाच दिवसांत तीन हजारांची घसरण : सोयाबीन काढणीला झाली सुरुवात
बीड : सोयाबीन हे चांगला भाव मिळणारे पीक असल्याने जिल्ह्यात कापूस क्षेत्रामध्ये घट होऊन सोयाबीनचा पेरा एक लाख हेक्टरने वाढला. हंगामाच्या सुरुवातीला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी अनेक स्वप्ने बघितली होती; मात्र मागील पाच दिवसांत सोयाबीन दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली असून, ५ हजार ७०० रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा सोयाबीन पिकाला मिळणारा भाव कमी झाला आहे. मागील हंगामाच्या शेवटी सोयाबीनला ११ हजारांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या होत्या. परिणामी, जिल्ह्यात जवळपास २ लाख ८५ हजार हेक्टर इतक्या विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. सोयाबीन पीक चांगले बहरात असताना अतिवृष्टीमुळे काही तालुक्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनातदेखील घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्पादनात अतिवृष्टीमुळे घट झाली तरीदेखील चांगला भाव असल्यामुळे ही तूट भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु मागील पाच दिवसांत सोयाबीनच्या दरात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर, सोयाबीन आयात केल्यामुळे हे दर कमी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे.
एकरी चार हजारांचा खर्च
सोयाबीन पेरणी ते काढणीपर्यंत एकरी जवळपास ३५०० ते ४ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तरच चार पैसे त्यांच्या हातात राहणार आहेत; मात्र सोयाबीन काढणीला आल्यानंतर अचानक भाव पाडून शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी यंत्रणा शासनाकडून राबवली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केला आहे.