देणे टाळण्यासाठी घरफोडीची खोटी फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:14 AM2019-06-19T00:14:51+5:302019-06-19T00:15:12+5:30
गावातील लोकांकडून घेतलेले पैसे वापस देण्याचे टळावे आणि आपला बचाव व्हावा या इराद्याने घरफोडीची खोटी तक्रार दिल्याचा प्रकार उघडकीस आला
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गावातील लोकांकडून घेतलेले पैसे वापस देण्याचे टळावे आणि आपला बचाव व्हावा या इराद्याने घरफोडीची खोटी तक्रार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धारुर तालुक्यातील गावंदरा येथील घरफोडीची तक्रार आल्यानंतर तपासात फिर्यादी खोटे बोलत असल्याचा संशय बळावल्याने सर्व माहिती जाणून घेत दरोडा प्रतिबंधक पथकाने हा सगळा प्रकार उघड केला. देणेकऱ्यांनी पैशाची मागणी करु नये म्हणून घरफोडीची तक्रार दिल्याची कबुली अखेर फिर्यादीने पोलीसांसमोर दिली.
धारुर तालुक्यातील गावंदरा येथील बाबासाहेब लक्ष्मण कांबळे यांनी १६ जून रोजी धारुर ठाण्यात घरफोडी झाल्याची तक्रार दिली होती. यामध्ये १ लाख ७ हजार व सोन्याचे दागिने असा १ लाख २५ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे सांगितले होते. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करण्यासाठी दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोहे. अभिमन्यू औताडे, पोना नागरगोजे, साबळे आदी कर्मचाऱ्यांचा कारवाईत सहभाग होता.
घटनेबाबत विचारपूस सुरु केली असता फिर्यादी कांबळे खोटे बोलत असल्याचे सपोनि जाधव यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सखोल माहिती जाणून घेतली तेव्हा कांबळे यांनी शुक्रवारीच गावातील गोविंद कांबळे यांना त्यांची जागा विक्री करुन त्या व्यवहारातून १ लाख रुपये मिळाले होते. बाबासाहेब यांनी याच रकमेतून नंतर गावातील शंकर बडे यांचे उसनवारीने घेतलेले ५० हजार व बाळू कांबळे यांचे १० हजार दोघांना परत दिले होते.
सपोनि जाधव यांनी दोघांकडेही याबाबत चौकशी करुन पडताळणी केली. बाबासाहेब यांच्याकडे पुन्हा विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र गावातील काही देणेक-यांचे पैसे देणे बाकी आहे. लोकांनी पैसे मागू नयेत म्हणून धारुर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केल्याची कबुली दरोडा प्रतिबंधक पथकाजवळ
दिली.