कौटुंबिक वाद; चिमुकल्यांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 01:02 AM2018-10-31T01:02:56+5:302018-10-31T01:06:00+5:30

कौटुंबिक वाद, तणाव आणि आलेल्या रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना पाण्याच्या हौदात बुडवून ठार मारले. त्यानंतर ती निर्दयी माता माहेरी निघून गेली.

Family dispute; The victim of pinch | कौटुंबिक वाद; चिमुकल्यांचा बळी

कौटुंबिक वाद; चिमुकल्यांचा बळी

Next
ठळक मुद्देनिर्दयी मातेचा कहरपोलिसांनी लावला प्रकरणाचा दोन तासांत छडापतीने चारित्र्यावर संशय घेतल्याने रागाच्या भरात पोटच्या गोळ्याला टाकले हौदात

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कौटुंबिक वाद, तणाव आणि आलेल्या रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना पाण्याच्या हौदात बुडवून ठार मारले. त्यानंतर ती निर्दयी माता माहेरी निघून गेली. मात्र पोलिसांनी योग्य दिशेने तपास करीत अवघ्या दोन तासांत छडा लावला आणि खुनी मातेला गजाआड केले. तीनेही केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वारंवार पतीकडून घेतलेल्या चारित्र्यावरील संशयातून आपण हे कृत्य रागाच्या भरात केल्याचे तीने पोलिसांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, या ह्रदयद्रावक घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीड तालुक्यातील खांडे पारगाव येथील राधेश्याम आमटे हे काही वर्षांपूर्वी रिक्षा चालविण्यासाठी बीडला आले. शहरातील नरसोबानगर भागात ते किरायाच्या घरात रहात होते. आई-वडील व छोटा भाऊ, पत्नी आणि गौरी, गायत्री आणि चार महिन्यांची मुलगी असा त्यांचा परिवार. राधेशाम यांना दारूचे व्यसन आहे. त्यामुळे घरात भांडणे होत होती. राधेशाम हा पत्नी दीपालीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून त्याने अनेकवेळा दीपालीला मारहाणही केली होती. काही दिवसांपासून तर हे दररोजचेच झाले होते. याला दीपाली पूर्णत: वैतागली होती. दोन दिवसांपूर्वी तिचे पतीसोबत कडाक्याचे भांडणही झाले होते. यावेळी तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळीच सासु, सासरा, दीर आणि मोठी मुलगी गौरी हे दीपालीच्या नणंदेकडे बार्शीनाका येथे गेले होते. राधेशाम हा रिक्षा घेऊन गेला. दीपाली घरी एकटीच होती. दिवसभर विचार केला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिने गायत्री आणि चार महिन्यांच्या चिमुकलीला जवळ घेतले. अगोदर गायत्रीला हौदात टाकले. त्यानंतर चार महिन्याच्या चिमुकलीला. नऊ महिने पोटात वाढविलेल्या मुली डोळ्यासमोर बुडत असतानाही केवळ राग असल्याने दीपाली घराला कुलूप लावून अंधारात बाहेर पडली. रात्री ९ वाजेच्या सुमारास पती राधेशाम घरी आल्यावर त्याला पत्नी आणि मुली दिसल्या नाहीत. त्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. तेवढ्यात खेर्डा (ता.गेवराई) येथील दीपालीच्या माहेरच्यांनी पोलिसांना फोन केला. घडलेला प्रकार सांगितला. खात्री पटल्यावर पोलिसांनी घरी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. जिल्हा रूग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. राधेश्यामच्या फिर्यादीवरून दीपालीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. घडला प्रकार भावासमोर कथन मुलींना हौदात टाकल्यावर दीपाली खेर्डा या आपल्या माहेरी गेली. घरी जाताच तिने आपण रागाच्या भरात केलेले कृत्य भावासमोर कथन केले. भावाने तात्काळ गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या कानावर ही बाब टाकली. त्यांनी पोलिसांना फोन करून कल्पना दिली. शिवाजीनगर पोलीस तात्काळ खेर्डात पोहचले आणि दीपालीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने आपण हे कृत्य केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

राधेश्यामच होता आरोपीच्या पिंजऱ्यात

राधेशामवर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांवर प्राणघातक हल्ले त्याने केलेले आहेत. त्याचे रेकॉर्ड पहात पोलिसांचा संशय राधेशामवर होता. त्यातच तो रात्री काही वेळ गायब होता. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्याला बसस्थानकातील शौचालय परिसरात ताब्यात घेतले. मात्र चौकशीत दीपालीने सर्व कबुली दिल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.

एसपी, डीवायसपींची धाव

घटनेचे गांभीर्य पाहत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर शिवाजीनगर ठाण्याचे पोनि शिवलाल पुरभे हे रात्रभर या प्रकरणाचा छडा लावत होते. त्यांच्यासोबत ठाण्यातील कर्मचारीही होते. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना याबाबत माहिती देण्यात येत होती.

दीपालीला जीवे मारण्याच्या धमक्या

राधेशाम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो नेहमी दीपालीला त्रास देत असे. रविवारी त्याने दीपालीला मारहाण करून तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच कोयत्याने तुकडे करण्याची धमकीही दिली होती. यामुळे दीपाली दहशतीखाली होती. यातूनच तिने हे कृत्य केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

गौरीला बसला धक्का

आई आणि आपल्या लहान बहिणींना भेटून गौरी आत्याकडे गेली होती. मंगळवारी सकाळी तिला हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला. आईकडे पाहून तिने जोरात आक्रोश केला. आपल्या बहिणींचे मृतदेह पाहून ती काही वेळासाठी बेशुद्धच झाली होती. इतर नातेवाईकांनाही ही घटना समजल्यानंतर धक्का बसला.

Web Title: Family dispute; The victim of pinch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.