कुटुंबकलह, रुसव्यातून सोडले घर, सात महिन्यांत ३६१ जण बेपत्ता, सापडले फक्त २३९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:57+5:302021-08-20T04:38:57+5:30

बीड : कौटुंबिक कलह, रुसवे-फुगवे, एकमेकांतील कटुता, प्रेमप्रकरण यांसह अन्य काही कारणांनी घराचा उंबरठा ओलांडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...

Family quarrel, house left in Russia, 361 people missing in seven months, only 239 found | कुटुंबकलह, रुसव्यातून सोडले घर, सात महिन्यांत ३६१ जण बेपत्ता, सापडले फक्त २३९

कुटुंबकलह, रुसव्यातून सोडले घर, सात महिन्यांत ३६१ जण बेपत्ता, सापडले फक्त २३९

Next

बीड : कौटुंबिक कलह, रुसवे-फुगवे, एकमेकांतील कटुता, प्रेमप्रकरण यांसह अन्य काही कारणांनी घराचा उंबरठा ओलांडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना महामारीच्या काळात यंदा हे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत अधिक वाढले आहे. जिल्ह्यात सात महिन्यांत वेगवेगळ्या वयोगटांतील ३६१ जण बेपत्ता झाले. यापैकी केवळ २३९ जण सापडले असून, अद्याप १२२ जणांचा थांगपत्ता लागलेला नाही.

घरात कोणालाही काही न सांगता निघून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोना काळातील आकडेवारी चिंताजनक आहे. १ जानेवारी ते ३१ जुलैदरम्यान जिल्ह्यातून सुमारे ३६१ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली. यात २२८ महिला व १३३ पुरुषांचा समावेश आहे. बेपत्ता होणाऱ्यांचे चालू वर्षीचे प्रमाण धक्कादायक आहे.

महिन्याकाठी ५१ जण गायब होत असून, यात किशोरवयीन मुले-मुली व विवाहित महिलांचे प्रमाण अधिक आहे.

१८ वर्षांपुढील व्यक्ती गायब झाल्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता (मिसिंग) नोंद होते तर मुलगा किंवा मुलगी १८ वर्षांच्या आतील असतील तर थेट अपहरणाचा गुन्हा नोंद केला जातो. अशी प्रकरणे गांभीर्याने हाताळली जातात. बेपत्ता व्यक्तींची ठाण्यात नोंद झाल्यानंतर सीसीटीएनएस प्रणालीत संबंधित व्यक्तीचा फोटो व माहितीचा तपशील अपलाेड केला जातो. राज्यभरातील बेपत्ता व्यक्तींची नोंद यात असते. मोबाइल लोकेशनसह सीसीटीएनएसद्वारे बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात येतो तर काही जण स्वत:हून पुन्हा घरी परततात.

....

काय आहेत कारणे

बेपत्ता होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. प्रामुख्याने कौटुंबिक वाद, परस्परांबद्दलचे गैरसमज, राग, रुसवा, विसंवाद, बिकट परिस्थिती या कारणांमुळे अनेक जण घर सोडतात. किशोरवयीन तसेच १० ते ३० वयोगटातील मुले-मुली प्रेमप्रकरण, हायप्रोफाइल राहणीमानाचे आकर्षण, वाईट संगत, व्यसनाधीनता यातून पलायन करतात.

...

बेपत्ता होण्यामागे व्यक्तीपरत्वे कारणे वेगवेगळी असतात, पण अल्पवयीन मुला-मुलींचे घरातून निघून जाणे अधिक काळजीचे असते. त्यामुळे पालकांनी सुसंवाद ठेवला पाहिजे. आपल्या पाल्यांचे मित्र कोण आहेत, ते कोठे जातात, काय करतात याकडे लक्ष दिले पाहिजे. सोशल मीडियावर ते काय पाहतात, काय ॲक्टिव्हिटी करतात यावरही वॉच ठेवायला हवा. त्यांच्याकडून काही चुकीचे होत असेल तर शिक्षा करण्याऐवजी वेळीच समुपदेशन केले पाहिजे. यातून संभाव्य धोके टळू शकतात.

- सुनील लांजेवार, अपर अधीक्षक, बीड

....

किती हरवले, किती सापडले

वर्ष एकूण बेपत्ता महिला पुरुष

२०१८ ३०४ १८६ ११८

सापडले एकूण २८१ १७० १११

२०१९ ४९४ २९१ २०३

सापडले एकूण ४३३ २६५ १६८

२०२० ५७२ ३५५ २१७

सापडले एकूण ४६७ २८३

२०२१ ३६१ २२८ १३३

सापडले एकूण २३९ १५३ ०८६

.....

- चालू वर्षी सात महिन्यांत

८० अल्पवयीन मुले-मुली गायब झाली. अल्पवयीन असल्याने पोलीस ठाण्यात अपहरण म्हणून नोंद झाली. त्यात ६९ मुली व ११ मुलांचा समावेश आहे. यापैकी ४७ मुली व ७ मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. यापैकी बहुतांश जणांनी प्रेमप्रकरणातून पलायन केल्याचे तपासात समोर आले. २४ जणांचा अजून शोध लागलेला नाही.

.....

190821\19bed_6_19082021_14.jpg

सुनील लांजेवार

Web Title: Family quarrel, house left in Russia, 361 people missing in seven months, only 239 found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.