राखेच्या प्रदूषणाविरुद्ध आत्मदहनासाठी कुटुंब थडकले थर्मलच्या गेटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:41+5:302021-05-22T04:31:41+5:30
परळी : तालुक्यातील दाऊतपूर येथील परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राखतळ्यातील राखेची वाहतूक विनापरवाना काही राख व्यावसायिक ...
परळी : तालुक्यातील दाऊतपूर येथील परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राखतळ्यातील राखेची वाहतूक विनापरवाना काही राख व्यावसायिक करीत आहेत. गुरुवारी राख वाहतुकीमुळे प्रदूषणाचा त्रास होत असल्याने दादाहारी वडगावातील एका कुटुंबाने आत्मदहनाचा इशारा दिला आणि अचानक आत्मदहन करण्यासाठी हे कुटुंब चक्क नवीन विद्युत केंद्राच्या गेटवर जाऊन थांबले. हा प्रकार कळताच गावातील कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी धाव घेत त्या कुटुंबाची समजूत घातली.
तीन दिवसांपूर्वीच वडगावच्या ग्रामस्थांनी राख प्रदूषणाला कंटाळून परळी-गंगाखेड मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतरही तालुक्यातील दाऊतपूर येथील राखतळ्यातून राखेची वाहतूक चालूच आहे. याचा दादाहारी वडगावच्या ग्रामस्थांना त्रास होत आहे. या गावच्या रस्त्यावर घर असलेल्या एका कुटुंबाने राखेचे प्रदूषण कमी होत नाही म्हणून गुरुवारी नवीन औष्णिक विद्युत केंद्राच्या गेटवर आत्मदहनाचा इशारा दिला. इशारा देताच परळी ग्रामीण पोलीस अधिकारी व वडगावचे ग्रामस्थ थर्मल गेटवर आले व त्या कुटुंबाची समजूत काढली. राखेचे प्रदूषण व राखेची वाहतूक बंद करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कुटुंब गावात आले.
दरम्यान, वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे यांनी सांगितले की, आमच्या गावातील ग्रामस्थ राखेच्या प्रदूषणास वैतागले आहेत. दोन वेळा रास्ता रोको आंदोलन करूनही राख वाहतूक चालूच आहे. त्यामुळे आता नक्षली आंदोलन करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले आहे. हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी गुरुवारी राखतळ्याच्या परिसरात जाऊन तेथे असलेली वाहने हुसकावून लावली होती. सकाळी पोलीस येऊन गेले व दुपारनंतर पुन्हा राखेची वाहतूक चालू होती. त्यामुळे आता वडगावचे ग्रामस्थ दोन दिवसांत तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा देणार आहेत.