नातेवाईकांचा निरोप ठरला अखेरचा; ऊस तोडणीस निघालेल्या मजुरास पत्नीसमोरच वाहनाने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 01:09 PM2020-10-29T13:09:01+5:302020-10-29T13:12:17+5:30
डोक्यावरून कारचे चाक गेल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला.
दिंद्रुड : मेहकर-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नित्रुड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत उसतोड मजूर जागीच ठार झाला. ही घटना बुधवार रात्री ७ वाजेदरम्यान घडली. शेख हमजा शेख बासु (40, नित्रुड ) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. गावातील नातेवाईकांचा निरोप घेऊन निघाल्यानंतर पत्नी ५० मीटरवर उसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नित्रुड येथील शेख हामजा हे उसतोड कामगार आहेत. बुधवारी सायंकाळी शेख हामजा हे पत्नी आणि इतर मजुरांसोबत दुसऱ्या गावी निघाले होते. त्यांची पत्नी सामान घेऊन इतर मजुरांसोबत वाहनात बसली होती. यावेळी शेख हामजा गावातील नातेवाईकांच्या भेटी घेत रस्त्यावर उभ्या वाहनाकडे येत होते. रस्त्यावर आल्यानंतर अवघ्या ५० मीटरवर वाहन असताना माजलगावकडून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना चिरडले.
यावेळी मोठा आवाज झाल्याने वाहनातील मजूर त्या दिशेने पळाले. यावेळी शेख हामजा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेले होते. डोक्यावरून कारचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत कार घटनास्थळावरून भरधाव वेगात निघून गेली. अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली.