३० वर्षे काम केलेल्या सालगड्याला निरोप - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:02+5:302021-04-17T04:33:02+5:30
बदलत्या काळात कुठे साल तर कुठे मनमुटावामुळे मालक आणि सालगड्यातील नाते दुरावत असताना तीन दशके काम करत ऋणानुबंध घट्ट ...
बदलत्या काळात कुठे साल तर कुठे मनमुटावामुळे मालक आणि सालगड्यातील नाते दुरावत असताना तीन दशके काम करत ऋणानुबंध घट्ट असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.
शेतात सालगडी ठेवल्यानंतर एक वर्ष त्याला टिकविणे म्हणजे मालकाची कसोटीच असते. अर्ध्यावर सालगडी पळून गेल्याच्या अनेक घटना सतत चर्चेत असतात. अशा परिस्थितीत शेती मालकाचे होणारे हाल पाहवत नाहीत. शेतीसाठी सालगड्याचं साल चैत्र पाडव्याला ठरवले जाते. मात्र, पाडवा ते पाडवा सालगडी टिकवताना मालकांना कसरतच करावी लागते. मात्र, तालुक्यातील अंजनडोह येथील प्रसंगाने शेतकरी व सालगड्यांना आगळीवेगळी प्रेरणा दिली आहे.
येथील सेवानिवृत्त शिक्षक व श्री विठ्ठल शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दगडूराव रावणराव सोळंके यांच्या शेतात गौतम लिंबाजी नेपते हे ३० वर्षांपासून सालगडी म्हणून काम करत होते. ३० वर्षांत कधीही वार्षिक साल ठरवले नाही. गावात जे साल असेल तेवढेच नेपते यांना दिले जायचे. कोणतीही बोलाचाली न होता दोन्ही कुटुंबाचे नाते घट्ट झाले होते. दोन मुले बाहेरगावी कामधंद्याला लागल्याने आणि वयोमानामुळे नेपते यांनी मालकाला सांगून काम बंद करण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडव्याच्या दिवशी कौटुंबिक कार्यक्रमात सोळंके कुटुंबाने गौतम नेपते यांचा कुटुंबासह यथायोग्य सत्कार करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. यावेळी दोन्ही कुटुंबातील मागील ३० वर्षांतील विविध आठवणींनी प्रत्येक सदस्याचे डोळे पाणावले होते.
===Photopath===
150421\4225img-20210413-wa0157_14.jpg