शेत, पाणंद रस्त्याची कामे होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:35+5:302021-05-29T04:25:35+5:30

अंबाजोगाई : शेत, शिव, पाणंद व गावरस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गावरस्ता समिती गठित करण्याचा निर्णय ...

Farm, Panand road works will not be done | शेत, पाणंद रस्त्याची कामे होईनात

शेत, पाणंद रस्त्याची कामे होईनात

googlenewsNext

अंबाजोगाई : शेत, शिव, पाणंद व गावरस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गावरस्ता समिती गठित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही अंबाजोगाई तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून गाव रस्ता समिती केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी. शेतमालाला बाजारात पोहोचविण्यासाठी आवश्यक रस्त्याची (पाणंद) कामे पूर्णत्वाला नेण्यासाठी गावपातळीवर गावसमित्या स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य शासनाने घेतला होता. तहसील कार्यालयामार्फत ग्रामपंचायतींना परिपत्रकाद्वारे अशा समित्या स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. या समित्या स्थापन झाल्या असत्या तर गावातील शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्ते मोठ्या प्रमाणात मोकळे झाले असते. प्रत्येकाला शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध झाला असता. ही यंत्रणा गावपातळीवरच कार्यरत असल्याने परस्परांतील वाद, तंटे, गावातच मिटवून रस्ते निर्माण होणार होते.

या ग्रामसमित्यांमध्ये सरपंच, अध्यक्ष तर मंडळाधिकारी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायतच्या महिला सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, कृषी साहाय्यक अधिकारी, बीट जमादार आदींचा समावेश असणार होता. या समित्या अस्तित्वात आल्या तर सर्वच विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचा समन्वय सहज उपलब्ध झाल्याने अनेक अडचणी सोडविल्या गेल्या असत्या. परंतु अशा समित्या अद्यापही कागदावरच आहेत. त्यांची अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न हीच ग्रामीण भागातील मुख्य समस्या असते.

या माध्यमातून गावपातळीवरच रस्त्याची कामे झाली असती.

ग्रामीण भागातील अनेक शिव रस्ते व पाणंद रस्ते आजही अतिक्रमण अवस्थेत आहेत. याचा मोठा अडथळा सामान्य शेतकऱ्यांना होतो. हे रस्ते अतिक्रमणमुक्त होऊन या रस्त्याच्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देऊन ग्रामसमितीच्या माध्यमातून असे रस्ते तत्काळ पूर्ण करावेत. या वर्षी झालेल्या मोठ्या पावसामुळे सर्वच रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.

गावोगावी या समित्यांच्या माध्यमातून रस्त्यांची पुनर्निमिती करण्यासाठी ही योजना दिशादर्शक ठरू शकते. यासाठी तहसील कार्यालयाने ग्रामसमित्या अस्तित्वात आणाव्यात, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे यांनी केली आहे.

Web Title: Farm, Panand road works will not be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.