बीडमध्ये शासकीय कार्यालयात विष घेतलेल्या शेतक-याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 12:19 PM2017-12-17T12:19:12+5:302017-12-17T12:21:27+5:30
इनामी जमीन पडताळणी प्रमाणपत्रासाठी वारंवार भू-सुधार कार्यालयात खेटे मारले, परंतु काम होत नसल्याने संतापलेल्या शेतक-याने १४ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या इमारतीत विषारी द्रव प्राशन केले होते. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणा-या या शेतक-याचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बीड : इनामी जमीन पडताळणी प्रमाणपत्रासाठी वारंवार भू-सुधार कार्यालयात खेटे मारले, परंतु काम होत नसल्याने संतापलेल्या शेतक-याने १४ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या इमारतीत विषारी द्रव प्राशन केले होते. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणा-या या शेतक-याचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या हालगर्जीपणामुळेच शेतक-याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.
प्रल्हाद हरीभाऊ टेकाळे (नागापूर बु. ता.बीड) असे त्या शेतक-याचे नाव आहे. नागापूर येथे गट नं. १०६ मध्ये सय्यद शफिक सय्यद हमजा यांची २० आर एवढी इनामी जमीन आहे. कृषीक प्रयोजनासाठी ही जमीन टेकाळे यांना देण्यात येणार होती. यासाठी उपजिल्हाधिकारी यांचे जमीन विक्री संदर्भात पडताळणी प्रमाणपत्र/हस्तांतरण करण्याची परवाणगी पाहिजे होती. यासाठी टेकाळे हे वर्षभरापासून भु-सुधार कार्यालयात खेटे मारत होते. परंतु येथील अधिकारी, कर्मचारी त्यांना टोलवाटोलवी करीत होते. १४ डिसेंबर रोजीही ते याच प्रमाणपत्रासाठी गेले होते. परंतु त्यांना अपेक्षित उत्तर मिळाले नाही. यावर वैतागलेल्या टेकाळे यांनी कार्यालयाच्या आवारातच विषारी द्रव प्राशन केले. यामध्ये त्यांना कार्यालयातील कर्मचा-यांनीच जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होती. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी नातेवाईकांची गर्दी जमली होती.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
दरम्यान, टेकाळे यांच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून संबंधित प्रशासनातील अधिकारी, कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी नातेवाईक आक्रमक झाले होते. परिस्थिती पाहून उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी ठाण्यात धाव घेत नातेवाईकांशी चर्चा केली. चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देताच नातेवाईकांचा संताप कमी झाल्याचे दिसले. सकाळी ११ पर्यंत ठाण्यात नोंद झालेली नव्हती. तर सुधीर खिरडकर हे ठाण्यात ठाण मांडून होते.
विष प्राशन केल्यावर परवाणगी
टेकाळे यांनी विषारी द्रव प्राशन केल्यानंतरच वर्षभर झोपेत असलेले प्रशासन खडबडून जागे झाले. १६ डिसेंबर रोजी पडताळणी प्रमाणपत्राला परवाणगी देण्यात आली. यावर उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांची स्वाक्षरीही आहे. प्रशासनातील कामे करून घेण्यासाठी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत असून प्रशासनाचा गलथान कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.