हातचे पीक गेल्याच्या धसक्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 06:03 AM2019-11-05T06:03:46+5:302019-11-05T06:04:08+5:30
रात्री जेवण करुन झोपल्यानंतर सकाळी कसे उठले नाही, ते पाहण्यासाठी पत्नी त्यांच्या खोलीत गेली
अंबाजोगाई (बीड) : परतीच्या पावसाच्या तडाख्याने हातातोंडाशी आलेल्या सोयाबिनचे अतोनात नुकसान झाल्याचा धसका घेतलेल्या पूस येथील ४५ वर्षीय शेतकºयाचा सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. प्रकाश कारभारी चोरमले असे मयत शेतकºयाचे नाव आहे. त्यांना पूस शिवारात रेणानदी परिसरात (ता. अंबाजोगाई)अडीच एकर शेती आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबिन मातीमोल झाल्याने मुलीचे लग्न कसे करावे, या चिंतेत ते होते.
रात्री जेवण करुन झोपल्यानंतर सकाळी कसे उठले नाही, ते पाहण्यासाठी पत्नी त्यांच्या खोलीत गेली. यावेळी चोरमले हे बेशुद्धावस्थेत दिसून आले. त्यांना तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यांचे मामगे वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
नाशिक, साताºयात आत्महत्या
नाशिक मनमाड तालुक्यातील माळेगाव येथील तरूण शेतकरी किरण दत्तू उगले (३०) यांनी कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे पिके उद्ध्वस्त झाल्याने गळफास घेऊन सोमवारी आत्महत्या केली. तर सातारा जिल्हात पाटण तालुक्यातील मरळी येथे अनिल रघुनाथ पाटील (४२) यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.