धारुर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; पेरणीच्या तोंडावर आठवड्यातील दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 04:20 PM2022-06-27T16:20:16+5:302022-06-27T16:20:50+5:30
घराच्या शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेवून संपवले जीवन
किल्लेधारूर (बीड) - धारुर तालुक्यातील पिंपरवाडा येथील एक तरुण शेतकरी सतिश नामदेव तिडके ( 38) याने गळफास घेवून आत्महत्या केली. पेरणीचे दिवस असताना कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने रविवारी रात्री मृत्यूला कवटाळल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
तालूक्यातील पिंपरवाडा येथील शेतकरी सतिश नामदेव तिडके या तरुण शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पिंपरवाडा येथे नामदेव तिडके यांचे कुटूंब राहते. त्यांना गावात जवळपास दहा एकर कोरडवाहू जमिन आहे. या शेतातच शेती करुन तिडके कुटूंबियांची उपजिविका भागते. मात्र, शेतीसाठी सतत कर्जाचा बोजा घेतला जात होता. या कर्जाला कंटाळूनच कुटूंबातील तरुण शेतकरी सतिश याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मृत शेतकरी सतिश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे.
रविवारी सायंकाळी घराच्या शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेवून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची नोंद धारुर पोलीसांत करण्याची प्रक्रिया सुरु आहे.