शेतकरी पिकास पाणी देण्यास गेला; इकडे चोरट्यांनी घरफोडून पावणे दोन लाखांचा ऐवज पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 02:39 PM2021-01-15T14:39:58+5:302021-01-15T14:40:55+5:30
वस्तीवरील घरात पत्नी आणि आई-वडील पहाटच्या गाड झोपेत असताना चोरांनी मारला डल्ला
कडा : मांआष्टी तालुक्यातील ढरे वस्तीवरील एका शेतकऱ्याच्या घरात घुसून चोरट्यांनी कृषीमाल विक्रीतून आलेले रोख १ लाख रुपये व अडीज तोळे सोने लंपास केले. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पाटण सांगवी येथील नवनाथ बबन मांढरे हे मांढरे वस्तीवर राहतात. गुरूवारी रात्री मुलाला घेऊन ते पिकाला पाणी देण्यासाठी गेले. वस्तीवरील घरी पत्नी, आई-वडील होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी सर्वजण गाढ झोपेत असताना घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. सामानाची उलथापालथ करून चोरट्यांनी एका पत्र्याची पेटी पळवली. बाजूच्या शेतात जाऊन त्यांनी पेटी फोडली. यात कांदा व तुरीची विक्री करून आलेले १ लाख रुपये व अडीज तोळे सोन्याचे दागिने होते. चोरट्यांनी हा एकूण १ लाख ७५ हजार रूपयाचा ऐवज लंपास केला. सकाळी हो चोरीस उघडकीस आली.