यार्डातील वजन काट्याचा शेतकरी, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा : गोविंद देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:30 AM2021-02-07T04:30:56+5:302021-02-07T04:30:56+5:30
अंबाजोगाई : यार्डातील वजन काट्याचा शेतकरी, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अंबाजोगाई बाजार समितीचे सभापती गोविंद देशमुख यांनी केले. ...
अंबाजोगाई : यार्डातील वजन काट्याचा शेतकरी, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अंबाजोगाई बाजार समितीचे सभापती गोविंद देशमुख यांनी केले.
अंबाजोगाई बाजार समिती परिसरात वजन काटा सुरू करावा, अशा मार्गदर्शक सूचना पणन महामंडळाने दिल्या होत्या तसेच या भागातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांनीही तशी मागणी केली होती. बाजार समितीने वजन काटा बसवला होता, मात्र तो बंद असल्याने अनेक शेतकरी व व्यापारी यांची अडचण होत होती. प्रशासकीय मंडळाने याचा विचार करत व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी सर्वात प्रथम वजन काटा सुरू करण्याचे ठरवले नव्हे त्याचा शुभारंभही आज करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती गोविंद देशमुख यांनी दिली.
यापूर्वी संचालक मंडळात आपणही होतो, मात्र त्यावेळी निर्णय घेता आले नाहीत. शेतकऱ्यांमध्ये बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळ शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेते, हा विश्वास निर्माण करणे याला मी सर्वात प्रथम प्राधान्य देतो. त्यासोबतच मोंढ्यातील सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांना काय अडचणी आहेत, त्या सोडविण्याचा प्रयत्न प्रशासकीय मंडळाकडून करण्यात येईल. शेतकरी शेतीमाल घेऊन मोंढ्यात आल्यानंतर आपल्या मालाचे वजन त्याला करता यावे, यासाठी वजन काटा सुरू होणे आवश्यक होते. त्यासाठीचे पहिले पाऊल उचलण्यात आले असल्याचेही देशमुख म्हणाले.
बाजार समितीच्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊन मोंढा भागातील रस्ते सुधारणे तसेच आठवडा बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या सोयी -सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वजन काटा अगोदर बाजार समिती कार्यालयाजवळ सुरू होता. मात्र, वाहनांना तिथे अडचण येत होती म्हणून खुल्या जागेत सुरू करण्यात आला आहे. या वजन काट्याचा शुभारंभ माझ्या हस्ते पार पडला, असे देशमुख म्हणाले.
यावेळी प्रशासकीय मंडळातील संचालक अमर देशमुख, आबासाहेब पांडे, दत्तात्रय यादव, प्रकाश सोळुंके तसेच मोंढ्यातील व्यापारी राजू भन्साळी, राजाभाऊ गंगणे, अशोकराव पाटील, शामराव मुळे, धनंजय कापसे, रमेश काकडे, रामानूंज मुंदडा, श्रीकांत मुंदडा आदी उपस्थित होते. बाजार समितीचे सचिव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.