शेतकऱ्यांचा तहसीलमध्ये ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:07 AM2019-11-30T00:07:20+5:302019-11-30T00:07:53+5:30
परतूर : पिकांचे मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शेतक-यांनी ...
परतूर : पिकांचे मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शेतक-यांनी नगर पालिकेलाही कुलूप ठोकून आपला संतप्त व्यक्त केला. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत तहसिलदारांनी नगर पालिकेला कारवाईचे आदेश दिले आहे.
परतूरमध्ये दिवसेंदिवस मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. ही जनावरे रात्री पिकांवर ताव मारत असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. या जनावरांनी पन्नास ते साठ एकरातील ज्वारी, कपाशी, तूर आदी पिकांची नासाडी केली. या जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पालिका दुर्लक्ष करीत आहे. या जनावरांच्या उपद्रवाला कंटाळून शेतक-यांनी तहसिल कार्यालयात ठिय्या मांडला. या जनावरांचा बंदोबस्त करून जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी. तसेच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक-यांनी तहसिलदार रूपा चित्रक यांच्याकडे केली. त्यानंतर शेतक-यांनी आपला मोर्चा नगर पालिकेकडे वळून पालिकेला कुलूप ठोकले. यावेळी नगरसेवक अंकूश तेलगड, कृष्णा आरगडे, भगवान मोरे, विदूर जईद, नामदेव काळे, सोपान जईद, सुरेश दसमले, महमद ईसा बाबामिया, संदीप जईद, रमेश राऊत, शेख अहेमद, शेख वजीर, गफ्फार सौदागर, ईमरान काचलीया यांच्यासह शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तात्काळ कारवाई करा- तहसीलदार
यावेळी तहसीलदार रूपा चित्रक यांनी नगर पालिकेच्या कर्मचाºयांना बोलवून घेतले. ही जनावरे पकडून संबंधितांवर कारवाई करावी. केलेल्या कारवाईचा अहवाल मला पाठवावा, असे त्यांनी सांगितले.