बीडमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 06:09 PM2019-07-15T18:09:45+5:302019-07-15T18:11:29+5:30

कंपनी म्हणते येईल, कृषी विभाग म्हणतेय माहिती नाही

Farmers in Beed wait for soybean insurance | बीडमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा कायम

बीडमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा कायम

googlenewsNext
ठळक मुद्देबीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतकऱ्यांनी विमा भरला आतापर्यंत ९ लाख ३९ हजार ५८५ शेतकऱ्यांना विमा मिळाला आहेअद्यापही ४ लाख ७२ हजार २८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित

बीड : जिल्ह्यात ४ लाख ७६ हजार ५६८ शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा भरला. पैकी १ लाख ३१ हजार ६२८ शेतकऱ्यांना २४६ कोटी ३४ लाख रूपयांचा विमा मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापही विमा मिळालेला नाही. याबाबत विचारल्यास विमा कंपनी आणि कृषी विभाग टोलवाटोलवी करीत आहेत.  दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे यावरून दिसून येत आहे. काही शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे सांगण्यात आले.

बीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतकऱ्यांनी ५३ कोटी ६६ लाख ६१ हजार रूपयांचा पीक विमा भरला होता. ७८४०२२ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. पैकी आतापर्यंत ९ लाख ३९ हजार ५८५ शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे. याची रक्कम ६४७ कोटी २९ लाख ३१ हजार एवढी आहे. अद्यापही ४ लाख ७२ हजार २८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे काही पिकांचा विमा मिळाला असला तरी सोयाबीनचा विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याबाबत शेतकरी दररोज ओरिएंन्टल इन्शुरन्स कपंनीला भेट देतात. बीडचे मुख्य शाखाधिकारी मिलींद ताकपेरे हे शेतकऱ्यांची समजूत काढण्याऐवजी टोलवाटोलवी करून काढता पाय घेण्यास सांगतात. कंपनीचे मुजोर अधिकारी दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना माहिती देत नाहीत. अशा परिस्थितीतही शेतकरी अपेक्षेपोटी कृषी विभागाकडे धाव घेतात. कृषी विभाग आम्हाला काही माहिती नाही, कंपनीला विचारा, असे सांगून हात झटकत आहेत. दोघांच्या मध्ये मात्र शेतकरी भरडला जात आहे. कंपनी व कृषी अधिकाऱ्यांच्या या टोलवाटोलवीमुळे शेतकरी आता संतापले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर आता आंदोलनाचा पावीत्रा घेतला आहे. 

शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका...
दुष्काळामुळे आगोदरच शेतकरी खचला आहे. त्यात कृषी व कंपनी हे विम्यासाठी शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत. त्यामुळे शेतकरी संतापला आहे. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय न घेतल्याने एका शेतकऱ्याने भर रस्त्यावर एका अधिकाऱ्याला चाबकाने झोडपले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका आणि तशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी पीक विमा तात्काळ वाटप करावा, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांमधून केली जात आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिल्याचे सांगण्यात आले.

कंपनीला नाही गांभीर्य
बीडच्या मुख्य शाखेसह प्रत्येक तालुक्यात एक विमा प्रतिनिधी नियूक्त केलेला आहे. मात्र, हे प्रतिनिधी शेतकऱ्यांना माहिती देत नाहीत. तसेच उद्धट वर्तणूक देऊन अरेरावी करीत आहेत. विमा कंपनीला शेतकऱ्यांचे गांभीर्य नसल्याचा आरोप केला जात आहे. 
आतापर्यंत भरपूर विमा दिला. लाभार्थी व रकमेची माहिती माझ्याकडे नाही. सोयाबीनचा विमा येईल. कधी येईल ते मला माहिती नाही. 
- मिलींद ताकपेरे, शाखाधिकारी, ओरिएंन्टल इंन्शुरंन्स कंपनी बीड

आमच्याकडे माहिती नसते. कंपनीच आम्हाला माहिती देते. 
- राजेंद्र निकम, जिल्हा कृषी अधीक्षक, बीड

Web Title: Farmers in Beed wait for soybean insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.