शेतकऱ्यांना करता येणार ऑफलाइन तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:36+5:302021-09-11T04:34:36+5:30
बीड : जिल्ह्यात ३१ ऑगस्ट व ८ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान ...
बीड : जिल्ह्यात ३१ ऑगस्ट व ८ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. अशा शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत तक्रार करण्याचे निर्देश प्रशासनाचे आहेत. मात्र, ऑनलाइन तक्रार करण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तालुकास्तरावर ऑफलाइन तक्रार करण्यासाठी कक्षाची उभारणी केली आहे.
खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन व कापूस तसेच फळबाग याचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. त्यांना नुकसानभरपाई कंपनीकडून मिळू शकते. दरम्यान, अशा विमाधारक शेतकऱ्यांना ‘भारतीय कृषी विमा कंपनी”च्या ॲपवर ऑनलाइन तक्रारी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना ही तक्रार कशी करायची याविषयी माहिती नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे यासंदर्भात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर तालुकास्तरावर ऑफलाइन तक्रार स्वीकारण्यासाठी कक्षांची निर्मिती करण्यात आली असून, ७२ तासांच्या आत तक्रार नोंदवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. पीक विमाधारक शेतकऱ्यांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तक्रार नोंद केली तरच लाभ मिळणार आहे त्यामुळे विहित नमुन्यात तक्रारीची नोंद करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तालुका कृषी कार्यालयात कक्ष
ज्या शेतकऱ्यांना ऑफलाइन तक्रार करायची आहे. त्यांच्यासाठी सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विमा कक्ष उभारण्यात आला आहे. याठिकाणी विमा कंपनीचे प्रतिनिधी असणार असून, त्याठिकाणी तक्रारी अर्ज देता येणार आहेत.
सुटीच्या दिवशी स्वीकारले जाणार अर्ज
शनिवार-रविवार सुटीचे दिवस आहेत, मात्र, शेतकऱ्यांना ऑफलाइन अर्ज करण्यासाठी मुभा असणार आहे. विमा कक्षावर कृषी व विमा प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडून आलेले तक्रारी अर्ज स्वीकारावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राधाबिनोद शर्मा, जिल्हाधिकारी