शेतकऱ्याच्या मुलीने केले धाडस अन झाली केन्ट विद्यापीठाची सिनेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:03 PM2019-09-05T12:03:12+5:302019-09-05T12:10:46+5:30
पाच हजार विद्यार्थ्यांचे करणार नेतृत्व
धारुर (जि. बीड) : तालुक्यातील बोडखा या छोट्या गावचे शेतकरी गंगाधर तिडके यांची नात अदिती विलास तिडके हिने अमेरिकेतील केन्ट विद्यापीठाची निवडणूक जिंकून ती सिनेटर झाली आहे. यामुळे ती अमेरिकेसारख्या प्रगत देशात पाच हजार विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तेलगावपासून जवळच असलेल्या बोडखा येथील शेतकरी गंगाधर तिडके यांचा मुलगा विलास गंगाधर तिडके हे काही वर्षांपासून नोकरीनिमित्त पुणे येथे राहत आहेत. त्यांची मुलगी अदिती ही अमेरिकेत फॅशन डिझाईनमध्ये अंडर ग्रॅज्युशन शिक्षण घेत आहे. ती शिक्षण घेत असलेल्या केन्ट विद्यापीठात नुकतीच निवडणूक झाली. अदितीने धाडस करत ही निवडणूक लढवली. विशेष बाब म्हणजे निवडणुकीत विजयी होऊन, अदिती विद्यापीठात सिनेटर झाली.
या ठिकाणी कॉलेज ऑफ आर्टसमधील सर्व म्हणजे पाच हजार विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी तिला मिळाली आहे. केन्ट विद्यापीठाच्या अंडरग्रॅज्युएशन स्टुडंटस गव्हर्नमेंट (युएसजी) मध्ये निवडली गेलेली पहिलीच भारतीय आहे. या अगोदर तिने इंडियन स्टुडंटस असोसिएशनची पहिली महिला अध्यक्ष म्हणून भारतीय विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले होते. तिचे मूळ धारुर तालुक्यातील डोंगराळ भाग असलेले बोडखा हे आहे. या निवडीबद्दल परिवारासह ग्रामस्थांनी आदितीचे स्वागत केले आहे.