स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्यावतीने शेतकरी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:18+5:302021-01-02T04:27:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांदूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या असून, कर्जमाफीमुळे बळीराजाला चांगली मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी थकीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटनांदूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या असून, कर्जमाफीमुळे बळीराजाला चांगली मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी थकीत कर्ज एकरकमी भरल्यास त्यांना मोठी सूट देण्यात येत आहे. यासह बॅंकेच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक डॉ. शरद वर्मा यांनी केले.
दिनांक ३० डिसेंबर रोजी बँकेकडून बळीराज्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘शेतकरी दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानोबा जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सत्यजित सिरसाट, पंचायत समिती सदस्य मच्छींद्र वालेकर, चेअरमन बन्सीसाहेब जाधव, भगवान सारडा, लिंबाजी दौंड उपस्थित होते.
यावेळी शाखा व्यवस्थापक डॉ. वर्मा म्हणाले, शेतकऱ्यांना आठ कोटी रुपयांहून अधिकची कर्जमाफी मिळाली आहे. उद्दिष्टापेक्षा तब्बल सहापट म्हणजेच अठरा कोटी रूपयांच्या कर्जाचे वाटप करून शाखा जिल्ह्यात अग्रणी राहिली आहे. काही शेतकऱ्यांचे कर्ज अद्यापही थकीत असून, त्यांच्यासाठी वनटाईम सेटलमेंट योजना बँकेने आणली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे नव्वद टक्क्यांपर्यंत लाभ मिळणार आहे. शासनाने सुरु केलेल्या सर्वच योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बँक करत आहे. बॅंकेचे कर्मचारी प्रत्येक तीन वर्षांनी बदलून जात असले, तरी बँक येथेच राहणार आहे. सर्वांनी आपले व्यवहार सुरळीत ठेवले तर त्याचा सर्वांनाच फायदा होईल, असेही डॉ. वर्मा यांनी सांगितले.
यावेळी बँकेकडे दत्तक असलेल्या व अन्य गावातील शेतकऱ्यांचा श्रीफळ व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते ह्दय सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनाेगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंदार देशपांडे यांनी केले. यावेळी दौंडवाडीचे सरपंच लिंबाजी दौंड, चंदनवाडीचे सरपंच बाळासाहेब गित्ते, महेश गारठे, प्रा. वसंत दौंड, शिरीष नाकाडे, गोविंद गित्ते, लक्ष्मीकांत निळे, संजय होळंबे, माऊली मुंडे, रामभाऊ वैद्य, बाबासाहेब मुंडे, सतीश बडे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा व्यवस्थापक डॉ. शरद वर्मा, उपव्यवस्थापक राकेश सिंग, मंदार देशपांडे, सचिन हिवरेकर, संतोष डहाळे यांनी परिश्रम घेतले.