शेतकऱ्यांनो खचू नका, नुकसानीची भरपाई नक्कीच देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:35 AM2021-09-03T04:35:41+5:302021-09-03T04:35:41+5:30
गेवराई : शेतकऱ्यांनो घाबरू नका, तुमचे जे नुकसान झाले त्याची भरपाई नक्कीच देण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. ...
गेवराई : शेतकऱ्यांनो घाबरू नका, तुमचे जे नुकसान झाले त्याची भरपाई नक्कीच देण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे शासन भरपाई देण्यास कटिबद्ध आहे, असा धीर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील दौऱ्यात शेतकऱ्यांना दिला. तालुक्यात सोमवारी रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने तलवाडा सर्कलमधील रामनगर, राजुरीमळा, राजापूरसह विविध भागात शेतातील उभी पिके भुईसपाट होऊन मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी रामनगर, राजुरमळा भागातील शेताच्या बांधावर बैलगाडीतून जाऊन पाहणी केली.
यावेळी पालकमंत्र्यांनी नुकसान झालेल्या शेतीची, रस्त्यावरील पुलांची तसेच घराची पडझडीची पाहणी केली. लवकरच पंचनामे करून नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला शासनाच्या वतीने मदत पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी माजी आ. अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी सचिन सानप, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब सोनवणे, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलवाड्याचे सरपंच विष्णू हात्ते, आक्रम सौदागर, मंडळ अधिकारी जितेंद्र लेडांळसह या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
020921\02_2_bed_13_02092021_14.jpeg~020921\02_2_bed_14_02092021_14.jpeg
गेवराई तालुक्यातील फळबागांचे नुकसान पाहणी~गेवराई तालुक्यातील फळबागांचे नुकसान पाहणी