कृषीमंत्र्यांच्या बीडमध्येच शेतकऱ्यांची पडवड; जिल्ह्यात दोन दिवसाआड शेतकरी संपवतोय जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 07:06 PM2024-10-18T19:06:29+5:302024-10-18T19:07:18+5:30

१७ जणांची मदतही नाकारली : १४ ऑक्टोबरपर्यंत १४५ शेतकरी आत्महत्या

Farmers fall in the beed of Agriculture Minister; A farmer ends his life every two days | कृषीमंत्र्यांच्या बीडमध्येच शेतकऱ्यांची पडवड; जिल्ह्यात दोन दिवसाआड शेतकरी संपवतोय जीवन

कृषीमंत्र्यांच्या बीडमध्येच शेतकऱ्यांची पडवड; जिल्ह्यात दोन दिवसाआड शेतकरी संपवतोय जीवन

बीड : परळी मतदारसंघातून आमदार झालेले धनंजय मुंडे यांच्याकडे राज्याच्या कृषी विभागाची जबाबदारी दिली. परंतु त्यांच्याच जिल्ह्यात सध्या दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवन संपवत आहे. जानेवारी ते १४ ऑक्टोबर या काळात तब्बल १४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे यातील १७ जणांची मदतही नाकारण्यात आली आहे.

बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. आतापर्यंत या मजुरांच्या जीवावर अनेकांनी राजकारण केले. परंतु त्यांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. तसेच जिल्ह्यातील काही तालुके हे दुष्काळी भाग म्हणून ओळखले जातात. त्यातच चालू वर्षात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. दुसऱ्या बाजूला पेरणी व मशागतीसाठी घेतलेले कर्ज फेडताना अडचणी आल्या. बँकवाले त्रास देऊ लागले. पिकांचे नुकसान झाल्याने मुलांचे लग्न लावण्याचा प्रश्न अनेकांच्या समोर उभा राहिला. त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत गेला आणि जिल्ह्यात २०२४ या वर्षात तब्बल १४५ जणांनी जीवनयात्रा संपविली आहे. विशेष म्हणजे हा कृषी मंत्र्यांचा जिल्हा आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आणल्या जात असल्याचा दावा केला जात असला तरी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने आणि कर्जाचा बोजा डोक्यावर झाल्याने शेतकरी आत्महत्यासारखे टाेकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसत आहे.

चार महिन्यांपासून प्रकरणे प्रलंबित
एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याला शासनस्तरावरून मदत केली जाते. परंतु जूनमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे अद्यापही शासन दरबारी चौकशीच्या नावाखाली प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. सध्या २३ प्रकरणे प्रलंबित असून, जूनमधील एक, जुलै ३, ऑगस्ट ८, सप्टेंबर ८ आणि ऑक्टोबरमधील ३ प्रकरणांचा समावेश आहे.

१७ प्रकरणे ठरविली अपात्र
नापिकी, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे शेतकऱ्यांनी जीवन संपविले. याची चौकशी प्रशासनाने केली. या शेतकरी आत्महत्या नाहीत, असे कारण काढून २०२४ मध्ये तब्बल १७ प्रकरणे नाकारण्यात आली आहेत.

आत्महत्या थांबविण्यासाठी काय प्रयत्न?
आत्महत्या थांबाव्यात यासाठी कृषी विभाग आणि प्रशासनाने काय प्रयत्न केले? हा देखील प्रश्न आहे. जिल्हा रुग्णालयात असलेले पूर्वीचे प्रकल्प प्रेरणा आणि आताचे मानसिक आरोग्य केंद्रही केवळ नावालाच आहे. येथून शेतकऱ्यांचे समुपदेशन, मार्गदर्शन होत नाही. हा विभाग केवळ नावालाच असून, येथील अधिकारी, कर्मचारी काहीच करत नसल्याचे दिसते.

अशी आहे आकडेवारी
महिना - आत्महत्या

जानेवारी - १८
फेब्रुवारी - १४
मार्च - १२
एप्रिल - १३
मे - १३
जून - २९
जुलै - १४
ऑगस्ट - १४
सप्टेंबर - १५
१४ ऑक्टोबरपर्यंत - ३
एकूण - १४५

Web Title: Farmers fall in the beed of Agriculture Minister; A farmer ends his life every two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.