हरभरा खरेदीसाठी माजलगावात शेतकरी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:37 AM2018-06-02T00:37:25+5:302018-06-02T00:37:25+5:30
माजलगाव येथील टीएमसी आवारात खरेदीच्या प्रतीक्षेतील १८ हजार क्विंटल हरभरा खरेदीसाठी शासनाने अचानकच आडवा दांडू लावला. हरभरा खरेदी बंद केल्याच्या विरोधात शुक्रवारी राष्टÑीय महामार्गावर २२२ वर सकाळी ११ वाजता शेतकरी व बाजार समिती पदाधिका-यांनी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले.
माजलगाव : येथील टीएमसी आवारात खरेदीच्या प्रतीक्षेतील १८ हजार क्विंटल हरभरा खरेदीसाठी शासनाने अचानकच आडवा दांडू लावला. हरभरा खरेदी बंद केल्याच्या विरोधात शुक्रवारी राष्टÑीय महामार्गावर २२२ वर सकाळी ११ वाजता शेतकरी व बाजार समिती पदाधिका-यांनी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनस्थळी एकही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल दोन तास हे आंदोलन चालले.
नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र येथील बाजार समिती मार्फत सुरु होते. हजारो शेतक-यांनी आॅनलाईन पध्दतीने नोंदणी करुन हरभरा विक्रीसाठी या ठिकाणी आणला. केंद्र सुरु झाल्यानंतर जवळपास १७ हजार ८८४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. मात्र दरम्यानच्या काळात बारदाना व गोदामाअभावी अनेक दिवस खरेदी केंद्र बंद राहिले. परिणामी संपुर्ण बाजार समिती आवारात तब्बल ३५ हजार क्विंटल हरभरा साठला तसेच खरेदी केलेली ५ हजार क्विंटल तूरदेखील बाजार समितीच्या आवारात पडून आहे.
हरभरा खरेदी बंद करुन शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरल्यामुळे शुक्रवारी बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती निळकंठ भोसले, पंचायत समिती सभापती जयदत्त नरवडे, प्रभाकरराव होके, रामेश्वर जमदाडे, प्रशात शेटे, शंतनु सोळंके, बालासाहेब जाधव, बाळासाहेब आगे, अंतराव सोळंके, सुहासराव सोळंके, पांडुरंग वगरे आदींसह हजारो शेतकºयांनी आंदोलन केले. गुन्हे दाखल झाले तरी बेहतर, आम्ही मरायला देखील तयार आहोत अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांनी तहसीलदार एन.जी. झंपलवाड यांना आंदोलनस्थळी येण्याचे कळविले. उन्हाचा पारा वाढत होता. घोषणा बाजी सुरु होती. अखेर दीड तासानंतर तहसीलदार आले व संध्याकाळपर्यंत संपुर्ण हरभºयाचा पंचनामा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. दरम्यान, गुरुवारपासून माजलगाव परिसरात पाऊस झाला आहे. उघड्यावरील हरभरा भिजण्याची शक्यता वाढली आहे.
तहसीलदार अर्धा तास उन्हात : भेट दिले हरभºयाचे पोते
आंदोलक एवढे संतापले होते की, तहसीलदार एन.जी. झंपलवाड यांना रस्त्यावर भर उन्हात अर्धातास बसविले. यावेळी चर्चेनंतर आंदोलकांच्या धसक्याने तहसीलदारांनी कुठलीही वेळ न दवडता पंचनाम्यास लगेचच सुरुवात केली. तहसीलदार एन.जी. झंपलवाड हे आंदोलनस्थळी दीड तास उशिरा आल्याने त्यांच्या पुढयात हरभ-याचे पोते ठेवुन आता याचं काय करायचं असा सवाल करीत हे पोत तुम्हालाच भेट घेवून जा असे म्हणुन आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.