दुष्काळाची दाहकता सहन होत नसल्याने शेतकऱ्याने केला अन्नत्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 12:55 PM2019-08-25T12:55:13+5:302019-08-25T13:05:26+5:30
एका शेतकऱ्याने भीषण दुष्काळामुळे हतबल झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग करत गावातील मारुती मंदिरासमोर ठाण मांडले आहे.
- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई-:अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडी येथील शेतकरी उत्तम भानुदास शेप या शेतकऱ्याने भीषण दुष्काळामुळे हतबल झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग करत गावातील मारुती मंदिरासमोर ठाण मांडले आहे. उत्तमराव यांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यावर गेल्या तीन वर्षापासून दुष्काळाचे भीषण सावट आहे. यावर्षी तर दुष्काळाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. खरीप पेरणी वाया गेली. रब्बीचा तर पेराच झाला नाही. यावर्षीही पावसाळा संपत आला तरी पाऊस नाही. यार्षीही पुन्हा पेरणी नाही. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गावात पिण्याचे पाणी नाही,राशन नाही,शेतात गुरांना चारा नाही,पाणी नाही. वर्षभर पाऊस नसल्याने कसलाच चारा नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती नसताना ही त्यांना पाच हजार रुपये प्रति टन दराने चारा खरेदी करावा लागत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ लागला आहे.
या स्थितीकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. गुरांचे व माणसांचे बेहाल सहन होत नसल्याने हनुमान यांचे निसिम्म भक्त असल्याने श्रद्धेपोटी अन्नत्याग करून हनुमान मंदिरात ठाण मांडून बसले आहेत.आज तिसऱ्या दिवशी ही ते मंदिरात बसून आहेत. उत्तमराव यांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थ हि चिंताग्रस्त झाले आहेत.