शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले; लॉकडाऊन काळात घरपोच भाजीपाला विक्रीतून कोटीची उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:41 PM2020-05-11T16:41:25+5:302020-05-11T16:42:47+5:30
एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे नुकसान होत असताना शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकर्यांना अडचणीच्या काळात भाजीपाला विक्री करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळावा म्हणून शासनाने घरपोहोच फळे व भाजीपाला विक्री उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फ त माजलगाव, धारुर, गेवराई, वडवणी या चार तालुक्यातील 184 शेतकरी गटाने 25 दिवसांत दीड कोटींचा भाजीपाला व फळे विक्री केले भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री केल्याने लॉकडाऊनमध्ये योग्य भाव मिळाल्याने शेतकर्यांनाही आर्थिक फायदा झाला.
कोरोनामुळे जिल्हाधिकार्यांनी विषम तारखेस सकाळी 7 ते 9.30 या वेळेत बाजारास परवानगी दिली होती. परंतु बाजारात खरेदी करण्यास होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने घरपोहोच भाजीपाला विक्री उपक्रम सुरू करुन थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला विक्री करण्याची परवानगी शेतकरी गटांना दिली. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत 15 एप्रिलापासून या उपक्रमास सुरुवात झाली. माजलगाव, धारुर, वडवणी, गेवराई या चार तालुक्यात 184 शेतकरी गटांनी 10 मेपर्यंत म्हणजे 25 दिवसांत तब्बल दीड कोटींचा भाजीपाला विक्री केला. या उपक्रमामुळे भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विक्री करता आल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फायदा झाला. एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे नुकसान होत असताना शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकर्यांना अडचणीच्या काळात भाजीपाला विक्री करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. आडत, दलाल यांच्यामुळे होणारे नुकसान थेट भाजीपाला विक्री केल्याने भरुन निघाल्याने शेतकर्यांमध्ये समाधान दिसत होते.
या गटाने केला भाजीपाला विक्री
माजलगाव तालुक्यातील 50 शेतकरी गटाने 1 हजार 397 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 73 लाख रुपये व्यवसाय केला. गेवराई तालुक्यात 71 गटांनी 1 हजार 578 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 53 लाख रुपये, वडवणी तालुक्यात 11 गटांनी 243 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 5 लाख रुपये आणि धारुर तालुक्यात 52 गटांनी क्विंटल भाजीपाला विक्री करुन 425 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 10 लाख रुपये असा एकूण अंदाजे एक कोटी 42 लाखांचा व्यवसाय केला.
शेतमालाला योग्य भाव मिळाला
घरपोहोच फळे व भाजीपाला विक्री उपक्रमामुळे ग्राहकांना थेट शेतकर्यांकडून ताजा व योग्य दरात भाजीपाला मिळाला. यामुळे ग्राहक समाधानी असून शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला. एवढेच नाही तर बाजारातील गर्दीवर नियंत्रण राहण्यास मदत झाली. लॉकडाऊननंतरही हा उपक्रम चालू ठेवण्याचा मानस आहे.
- सुरज मडके, उपविभागीय कृषी अधिकारी, माजलगाव