बोगस सोयाबीन बियाणांप्रकरणी बीड, हिंगोली, जालन्यात गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 07:43 PM2020-07-04T19:43:20+5:302020-07-04T19:45:37+5:30
कंपनीसह, विक्रेत्यांविरुद्ध होत्या शेतकऱ्यांच्या तक्रारी
बीड/जालना/सेनगाव (जि. हिंगोली) : निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे वितरित करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी जालन्यात अंकुर, बीडमध्ये जानकी, यशोधा, ग्रीनगोल्ड कंपनीवर आणि हिंगोली जिल्ह्यातील सेनगावात तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
मराठवाड्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस ठाण्यात तालुका कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक संदीप सखाराम वळकुंडे व कृषी विस्तार अधिकारी प्रताप पुंजाजी गाडे यांच्या फिर्यादीवरून ईगल सीडस् अॅण्ड बायोटेक लि़ इंदौर कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार मारोती बाबर तसेच मे़ अंकुर सीडस्चे व्यवस्थापक व रवींद्र श्रीकांत बोरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बीड जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीनचे क्षेत्र जवळपास १ लाख ९० हजार हेक्टर एवढे आहे. जिल्हाभरातून ३ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन न उगवल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. कृषी विभागाच्या वतीने सर्व तक्रारीची शेतात जाऊन पाहणी करून पंचनामा केला. त्यानुसार बीड तालुक्यातल तक्रारींचे पंचनामे करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी भुंजक खेडकर व त्यांचे सहकारी यांनी शनिवारी, रविवारी पाहणी करून पंचनामे केले. त्यावरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा खेडकर यांच्या फिर्यादीवरून मे.जानकी सिड्स अन्ड रिसर्च प्रा.लि. (पातुररोड, म्हैसपूर जि. अकोला) चे अनिल रमेश धुमाळ व यशोधा हायब्रीड सिड्स (हिंगणघाट जि. वर्धा) चे प्रदीप माणिकराव पाटील या दोन कंपनी व संबंधित व्यक्तिंविरोधात फसवणूक व बियाणे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी तालुक्यात सर्वाधिक १०७५ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणी पंचनामा केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ग्रीन गोल्ड सिड्स व कंपनीचे झोनल मॅनेजर संदीप मच्छिंद्र बवसकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यात ५५ तक्रारी
जालना जिल्ह्यात ५५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी नागपूर येथील अंकुर सीडस्चे व्यवस्थापक, तसेच संचालक आणि जालन्यातील विक्रेते भगवानबाबा कृषी सेवा केंद्राविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.