परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतकरी संकटात; सोयाबीन, कापूस पिके पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 08:15 PM2022-10-12T20:15:44+5:302022-10-12T20:17:22+5:30
या ढगफुटी सदस्य पावसामुळे सोयाबीन व कापूस या पिकांचे कमाल नुकसान झाले आहे.
दिंद्रुड ( बीड ) : माजलगाव तालुक्याच्या नित्रुड महसूल मंडळात मंगळवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उभे सोयाबीनचे व कापसाचे पीक पाण्यात गेले असून शेतकरी संकटात सापडला आहे. प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे.
नित्रुड महसूल मंडळात मंगळवारी दुपारी तीनच्यानंतर जवळपास चार तास मुसळधार पाऊस झाला. या ढगफुटी सदस्य पावसामुळे सोयाबीन व कापूस या पिकांचे कमाल नुकसान झाले आहे. विमा कंपन्यांकडे विमा भरूनही विमा मिळत नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त आहे. नित्रुड महसूल मंडळातील गट नंबर 65 मधिल अनंत विठ्ठलराव नाईकनवरे यांच्या तिन एकर कापूस व दोन एकर सोयाबीनमध्ये पाणीच पाणी झाले आहे. नुकसानीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाईकनवरे यांनी बोंबमारो आंदोलन केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सरकार भांडणात व्यस्त तर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे लक्ष नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. प्रचंड नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे शेतकरी नाईकनवरे यांनी भावना व्यक्त केल्या.