शेतकऱ्याने केला सोशल मिडीयाचा कल्पक वापर; बांधावरच्या फळविक्रीतून मिळवले लाखोचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 07:48 PM2020-05-13T19:48:50+5:302020-05-13T19:51:55+5:30
जवळपास एक लाख २० हजार रुपयाचा खर्च वजा जाता चार लाख ८० हजार रुपयाचा निव्वळ नफा राहिला.
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दिड महिन्यापासून सर्वकाही ठप्प आहे. उद्योगधंदे, व्यापार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालालाही ग्राहक मिळत नाहीत. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असतना फुले पिंपळगावच्या शेतकऱ्याने मात्र अशा परस्थितीतही लाखोची कमाई केली. अडीच एकरात लावलेल्या खरबूजाची त्या शेतकऱ्याने थेट बांधावरून ग्राहकाला विक्री करत तब्बल ६ लाख रुपयाचे उत्पन्न घेतल्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
माजलगाव शहरापासून केवळ ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या फुले पिंपळगाव येथील शेतकरी अविनाश कोरडे याने त्याच्या शेतातील अडीच एकरात खरबूजाची लागवड केली होती. अविनाश कोरडे याने पहिल्यांदाज जानेवारी महिन्यात खरबूजाची लागवड करून पारंपारिक पिकला फाटा देत आधुनिक शेतीचा प्रयोग केला होता. लागवड केलेल्या खरबुजाला ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले होते, तसेच गावरान खतासह वेळोवेळी रासायनिक औषधांच्या फवारण्या केल्याने चांगले पिक आले होते. हे सर्व खरबूज मार्च महिण्यात तोडणीला आले असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले.
लॉकडाऊनच्या परस्थितीत खरबुजाच्या खरेदीसाठी व्यापारी धजावत नव्हते, ग्राहकही खरेदीसाठी येत नसल्याने कोरडे हतबल झाले. त्यानंतर त्यांना कल्पना सुचली अन सोशल मिडीयाचा कल्पकतेने वापर करत त्यावर खरबूज विक्रीसाठी जाहिरात केली. फुले पिंपळगाव हे शहराच्या जवळच असल्याने अनेक ग्राहकांनी खरबूज खरेदीसाठी रीघ लागली. कोणताही वाहतुकीचा खर्च, दलाली, व्यापाऱ्यांचे कमिशनसाठी पैसे न देता थेट बांधावर बसून कोरडे यांनी केवळ २० रुपये किलो या दराने खरबूजाची विक्री केली. दररोज दिड ते दोन टन फळाची विक्री होत असल्याने त्यांनी एक महिण्यात अडीच एकरातील जवळपास सर्वच खरबूजाची विक्री करून कोरोनातही चक्क सहा लाख रुपयाचे उपन्न घेतले. यासाठी त्यांना जवळपास एक लाख २० हजार रुपयाचा खर्च वजा जाता चार लाख ८० हजार रुपयाचा निव्वळ नफा राहिला.
अंतर राखण्यासाठी बांबू लाऊन केली खरबूजाची विक्री
सद्य स्थतीत कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने शारीरिक अंतर राखण्यासाठी अविनाश कोरडे यांनी शेतात बांबू लावले होते. यामुळे ग्राहकांमध्ये ठरावीक अंतर ठेऊन संपूर्ण फळ विक्री करण्यात आली.