माली पारगाव सबस्टेशनला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:58 PM2018-10-02T18:58:04+5:302018-10-02T18:59:22+5:30
तालुक्यातील माली पारगाव सब स्टेशनवरील वाघोरा फिडरवरील सात ते आठ गावाचा विद्युत पुरवठा मागील दिड महीन्या पासून खंडित आहे.
माजलगाव(बीड ) : तालुक्यातील माली पारगाव सब स्टेशनवरील वाघोरा फिडरवरील सात ते आठ गावाचा विद्युत पुरवठा मागील दिड महीन्या पासून खंडित आहे. यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी आज सकाळी सबस्टेशन कार्यालयाला कुलूप ठोकले.
माली पारगाव सब स्टेशनवरील वाघोरा फिडरवरुन पुरुषोत्तमपुरी, वाघोरा, मालीपारगाव, मंगरुल, मालेवाडी आदी गावे व तांड्यांना विद्युत पुरवठा होतो. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दिड महिन्यांपासून या भागात विद्युत पुरवठा खंडित आहे. पावसाअभावी या भागातील पिके वाळत त्यांना कालव्यातील पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता आहे.
याबाबत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदने दिली. मात्र वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. यामुळे आज सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी सबस्टेशनला कुलूप लावून तिथे ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात पंचायत समिती सभापती जयद्रत नरवडे, सरपंच संजय नरवडे, हनुमंत बादाडे, तुकाराम सोलंके, शिवाजी सोजे आदींची उपस्थिती होती.