पुणे येथील विमा कंपनीच्या कार्यालयास माजलगावच्या शेतकर्यांनी ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:17 PM2019-06-17T16:17:54+5:302019-06-17T16:18:49+5:30
कंपनीकडून महिनाभरात पैसे अदा करण्याचे आश्वासन
माजलगाव (बीड ) : जिल्ह्यात गतवर्षी पडलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन पिकासह सर्वच पिके करपून गेली. शेतकर्यांनी दरवर्षीप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीकडे विमा भरला, मात्र अद्याप ही या शेतकर्यांना विम्याची रक्कम अदा करण्यात न आल्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन केले. यावर कंपनीने एक महिन्यात शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले.
गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढावली. परिणामी शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने सोयाबीनसह इतर पिके जळून गेली. परंतू आपल्या पिकाचे विमा संरक्षण ही शेतकर्यांनी काढले होते. जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे काम दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीला दिले होते. सर्व पिके गेली असतांना यावर्षी पेरणीचे दिवस आले असतांना विमा कंपनीने विम्याचे रक्कम शेतकर्यांना अदा केली नाही. वारंवार प्रशासनासह विमा कंपनीकडे पैस्याची मागणी करून प्रशासन व विमा कंपनी दाद मिळत नव्हती. परिणामी शेतकरी आपल्या हक्काच्या पैशापासून वंचित राहू लागला.
यावर शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभिषण थावरे यानी पुढाकार घेवून शेकडो शेतकर्यांसह सोमवार दि.17 रोजी थेट पुणे येथील दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीच्या मुख्यालयावर मोर्चा नेत आमच्या हक्काचे पैसे द्या, अशी मागणी करत कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन केले. निर्ढावलेले कंपनीच्या प्रशासनाचे डोळे उघडले अन् त्यानी महिनाभरात शेतकर्यांची विम्याची रक्कम खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी दिले.