माजलगावात शेतकऱ्यांनी काढला तहसीलवर बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 04:28 PM2018-09-18T16:28:23+5:302018-09-18T16:29:42+5:30
शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
माजलगाव (बीड ) : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत या मुख्य मागणी सह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी बैलगाडीसह सहभागी होते.
परभणी चौकातून हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर चौक मार्गे मोर्चा तहसीलवर धडकला. या ठिकाणी शेतकऱ्यांनी कारखान्याविरुद्ध व प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकीत पैसे द्यावे, आगामी गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याशिवाय गेटकेन ऊस आणू नये, कमी पाऊस झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी , लवादाचा करार तीन वर्षांचा करण्यात यावा, इंधन दरवाढ रद्द करण्यात यावी, पीक विमा व बोंडअळीचे पैसे त्वरित देण्यात यावेत अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांना देण्यात आले.