शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक; राहिले फक्त १५ दिवस
By शिरीष शिंदे | Published: August 31, 2022 01:40 PM2022-08-31T13:40:35+5:302022-08-31T13:41:01+5:30
सुधारित ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व्हर्जन-२ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
बीड : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ ची ई-पीक पाहणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमध्ये काही महत्त्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाइल ॲप-व्हर्जन-२ विकसित करण्यात आलेले आहे. हे सुधारित ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व्हर्जन-२ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. जमावबंदी आयुक्त कार्यालयाचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी तलाठ्यांना ई-पीक पाहणीचे प्रशिक्षण नुकतेच दिले. दरम्यान, सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीचे ॲप डाउनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करावी. ॲपमध्ये पिकाची नोंद करण्यासाठी १५ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.