सायगावात जनावरांसह शेतकरी रस्त्यावर; दोन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:22 AM2019-08-29T00:22:20+5:302019-08-29T00:23:14+5:30

शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करुन द्या या मागणीसाठी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव येथे शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरून बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले.

Farmers on the road with animals in Saigawa; Two hours traffic jam | सायगावात जनावरांसह शेतकरी रस्त्यावर; दोन तास वाहतूक ठप्प

सायगावात जनावरांसह शेतकरी रस्त्यावर; दोन तास वाहतूक ठप्प

googlenewsNext

अंबाजोगाई : शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करुन द्या या मागणीसाठी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव येथे शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरून बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. दोन तास झालेल्या या आंदोलनाने महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. अंबाजोगाईचे नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी घटनास्थळी जाऊन शेतक-यांचे निवेदन स्वीकारले.
तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीचा खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी गेला. यावर्षीचाही खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून गेला. सलग दोन वर्षे पाऊस न झाल्याने जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर झाला आहे. होता तो चारा सहा महिन्यापूर्वी संपला. शेतक-यांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असताना अशा स्थितीत चारा विकत घेणे मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे. अशी भीषण स्थिती असतांनाही प्रशासनाच्या वतीने चारा छावण्या सुरू झाल्या नाहीत. चारा डेपोही उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सर्व जलस्त्रोत निकामी झाले आहेत. जनावरांना चाराही नाही आणि पाणीही नाही अशा स्थितीत पशुधन सांभाळायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बर्दापूर, सायगाव, सुगाव, नांदगाव, पोखरी, मुडेगाव, दैठणा, वाघाळा व परिसरातील विविध गावच्या शेतक-यांनी बुधवारी सकाळी आपल्या जनावरांसह रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतक-यांनी जोरदार घोषणाबाजी करत दावणीला चारा उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली. नायब तहसीलदार गणेश सरोदे, मंडळ अधिकारी गोविंद जाधव यांनी घटनास्थळी जाऊन शेतक-यांचे निवेदन स्वीकारले व या मागणीसाठी वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. बर्दापूर पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्गावर बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

Web Title: Farmers on the road with animals in Saigawa; Two hours traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.