आगीत शेतकऱ्याच्या २ लाख रुपयांची झाली राख; ५ शेळ्यांचाही होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 01:25 PM2022-03-01T13:25:13+5:302022-03-01T13:26:50+5:30
अचानक लागलेल्या आगीत रोकड, संसारोपयोगी वस्तू जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.
कडा( बीड) : अचानक झोपडीवरील छपराला आग लागल्याने एका शेतकऱ्याची सारी जमापुंजी जळून राख झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वाहिरा येथील शेतवस्तीवर घडली. आगीत ५ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख रुपयांची रोकड आणि संसारोपयोगी वस्तू देखील जळाल्याने शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे.
वाहिरा येथील शेतकरी बापू महमंद शेख गावापासून जवळ असलेल्या शेतातील झोपडीवजा एका घरात पत्नी आणि मुलीसह राहतात. सोमवारी रात्री जेवणकरून शेख कुटुंब झोपी गेले. रात्री साडे अकराच्या दरम्यान अचानक झोपडीच्या छपराला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच शेख कुटुंबाने प्रसंगावधान राखत लागलीच बाहेर धाव घेतली. काही क्षणात संपूर्ण झोपडी जळून खाक झाली.
आगीत पोटाला चिमटा घेऊन जमा केलेली २ लाखांची रोकड राख झाली. तसेच ५ शेळ्याही होरपळून मृत्युमुखी पडल्या. काही क्षणात संपूर्ण झोपडी जळाल्याने यात संसारउपयोगी वस्तु, धान्य देखील जळून राख झाले. शेख यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. महसूल विभागाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशाने लागली हे अद्याप समजू शकले नाही.