शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रातच कापूस विक्रीसाठी आणावा- जगन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:30 AM2021-01-21T04:30:35+5:302021-01-21T04:30:35+5:30
बीड जिल्ह्यातील कापूस खरेदी सुरळीत पार पाडण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्याचे कळवले होते. ...
बीड जिल्ह्यातील कापूस खरेदी सुरळीत पार पाडण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्याचे कळवले होते. त्यानुसार, कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आलेली आहे. गेवराई येथे शासकीय हमीभावाने भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) यांच्यामार्फत कापूस खरेदी सुरू झालेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई यांच्यामार्फत ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्रीस आणण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले आहेत. एसएमएस प्राप्त शेतकऱ्यांनी आपला कापूस टीएमसी मार्केट यार्ड, जातेगाव रोड, गेवराई येथे विक्रीसाठी आणावा, येताना शेतकऱ्याने आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, सातबारा उतारा, आठ अ, रेशन कार्ड घेऊन यावे. सीसीआय १२ टक्क्यांच्या पुढील आर्द्रता असलेला कापूस घेत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस वाळवून आणावा.
गेवराई बाजार समितीने आजपर्यंत ७९९१ शेतकऱ्यांना सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीस आणण्यासाठी एसएमएस पाठविलेले आहेत, परंतु एसएमएस प्राप्त शेतकऱ्यांपैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्याप आपला कापूस विक्रीसाठी आणलेला नाही, असे निदर्शनास येत आहे. एसएमएस प्राप्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला कापूस सीसीआय कापूस खरेदी केंद्र गेवराई येथे विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती जगन पाटील काळे व सचिव गंगाभीषण शिंदे यांनी केले आहे.