शेतकऱ्यांनी ई-केवायसी ७ सप्टेंबरपर्यंत करुन घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
By शिरीष शिंदे | Published: September 4, 2022 05:44 PM2022-09-04T17:44:34+5:302022-09-04T17:45:22+5:30
केवायसी न केल्यास १२ सप्टेंबर रोजी वितरीत होणारा १४ वा हप्ता मिळणार नसल्याची माहिती.
बीड: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. त्या शिवाय १२ सप्टेंबर रोजी वितरीत होणारा १४ वा हप्ता मिळणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील कालावधीचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्या लाभार्थ्यांनी ही प्रकि्रया केली नाही, अशा लाभार्थ्यांचा पुढील लाभ थांबविला जाणार आहे. ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया अतिशय सोपी असून ती करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी खालील दोन पद्धतीने ही प्रक्रिया करता येईल.
लाभार्भी स्वतः pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर या टॅबमध्ये किंवा पीएम किसान अँपद्वारे ओटीपी द्वारे मोफत करता येईल. अथवा आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे ई-केवायसी प्रमाणीकरण करता येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्र (सीएससी सेंटर) येथे बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल.
दीड लाखाहून अधीक केवायसी अपूर्ण
जिल्हयातील ४ लाख ७९ हजार ८९० पैकी ३,१५,२७९ लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण तर १,६४,६११ लाभार्थ्यांनी केवायसी अद्याप केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांचा या योजनेचा पुढील कालावधीचा लाभ थांबविला जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया अद्याप केलेली नाही, त्यांनी ७ सप्टेंबर पूर्वी दोन पद्धतीपैकी एका पध्दतीने ही प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा पुढील लाभ सुरळीत करून घेण्याबाबत शासनाने कळविले असून त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.