शेतकरी पुत्राच्या मृदंगाचे बोल घुमले परदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:37 AM2019-10-28T00:37:55+5:302019-10-28T00:38:29+5:30
रघुनाथ महाराज ढोबळे या तरुणाने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंबात कुठलीच परंपरा नसताना गुरु युवराज महाराज देशमुख यांच्याकडून मृदंगाचे धडे घेतले. आज त्यांच्या मृदंगाचे बोल सातासमुद्रापार पोहोचले आहेत.
विष्णू गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील महांडुळा या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रघुनाथ महाराज ढोबळे या तरुणाने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंबात कुठलीच परंपरा नसताना गुरु युवराज महाराज देशमुख यांच्याकडून मृदंगाचे धडे घेतले. आज त्यांच्या मृदंगाचे बोल सातासमुद्रापार पोहोचले आहेत. गुरु युवराज महाराज देशमुख यांच्या सोबत त्यांनी मॉरिशस या परदेशातील कात्रबोन पालमा या गावी तब्बल एक महिनाभर तेथील १०० विद्यार्थ्यांना मृदंगाचे धडे दिले. ही बाब गौरवास्पद असून याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेवराई तालुक्यातील शेतकरी महादेव किसन ढोबळे यांना दोन मुले आहे. थोरला मुलगा रामदास ढोबळे हे शिक्षक म्हणून योगदान देत आहेत. धाकटा रघुनाथ महाराज ढोबळे हे लहानपणापासूनच धार्मिक क्षेत्रात आहेत. भजन, कीर्तनासह धार्मिक कार्यक्रमामुळे अध्यात्मिक क्षेत्रात जाण्याची आवड निर्माण झाली. वारकरी संप्रदायात मृदंग क्षेत्रात करिअर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून, ते उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण तीर्थराज महाराज पठाडे यांच्या राक्षसभुवन (ता.गेवराई) येथील शनि महाराज वारकरी शिक्षण संस्थेत झाले. पुढील शिक्षण आळंदी येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेत युवराज महाराज देशमुख यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने घेतले. वयाच्या १६ व्या वर्षी मृदंगाचे बोल शिकून पुढे मृदंग विशारद ही पदवी प्राप्त केली. संगीत क्षेत्रात एम.ए. ही पदवी देखील मिळविली. अल्पावधीतच वारकरी शिक्षण संस्थेत त्यांनी मृदंगाचे बोल अवगत केलेले असून, संस्कृतचे ते गाढे अभ्यासक आहेत.